भुदरगडचा शिष्यवृत्ती पॅटर्न राज्यात ‘लय भारी’

भुदरगड तालुका (Bhudargad) हा शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळखला जातो. या तालुक्याने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान आजअखेर कायम राखला आहे. सततच्या सराव चाचणींमुळे विद्यार्थी गुणवत्तेत नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.

    भुदरगड / अजित यादव : भुदरगड तालुका (Bhudargad) हा शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळखला जातो. या तालुक्याने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान आजअखेर कायम राखला आहे. सततच्या सराव चाचणींमुळे विद्यार्थी गुणवत्तेत नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. यावर्षी तालुक्याच्या शिक्षण विभागाने राज्यात दुसऱ्यांदा संचनिहाय सराव परीक्षेचे आयोजन आज केले.

    या शैक्षणिक वर्षात पाचवीचे १५०० तर आठवीचे १२०० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. या विद्यार्थ्यांची तीन सराव चाचण्या झाल्या आहेत. अंतिम परीक्षा २० जुलै रोजी आहे. पाचवी व आठवीचे २०० टॉपर विद्यार्थी निवडले असून, या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य शासकीय परिषदेच्या धर्तीवर A,B,C,D प्रश्नसंचनिहाय सराव परीक्षा दुसऱ्यांदा होत असून, शासकीय परीक्षेची रंगीत तालीम म्हणून या परीक्षेकडे पाहिले जात आहे. तालुक्यातील पाचवी व आठवीला शिकविणाऱ्या सर्व वर्गशिक्षकांची तालुकास्तरीय कार्यशाळा घेऊन तज्ञ मार्गदर्शकांनी विषय व घटकनिहाय मार्गदर्शन केले आहे.

    परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्तीच्या अंतिम परीक्षेत संचनिहाय प्रश्नपत्रिकांचा वापर केला जातो. या संचनिहाय प्रश्नपत्रिकांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी व परीक्षेची भीती दूर व्हावी, या उद्देशाने हा एक वेगळा प्रयोग गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, विस्ताराधिकारी प्रबोध कांबळे यांच्या प्रेरणेतून व तालुक्यातील तज्ञ शिष्यवृत्ती मार्गदर्शक यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे.

    भुदरगड व राधानगरी तालुक्यातील तज्ञ मार्गदर्शकांकडून या प्रश्नपत्रिका शासकीय परीक्षेच्या स्वरूपानुसार अथक प्रयत्नातून तयार केल्या आहेत. या प्रश्नपत्रिका राधानगरी, करवीर, आजरा तालुका व कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा वापरल्या जाणार आहेत.