भुजबळांनी कराडात पाऊल ठेवून दाखवावं! आरक्षणाच्या विधानावरून आटकेतील सकल मराठा समाजाचा इशारा

मंत्री छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज बांधवांविरोधात गरळ ओकत आहेत. त्यांनी कराडमध्ये येऊन दाखवावे असे आव्हान देत, आम्ही त्यांना आमची ताकद दाखवू असा सज्जड इशारा आटके या. कराड गावातील सकल मराठा समाज बांधवांनी दिला आहे. त्याचबरोबर भविष्यात पुन्हा मराठा समाजाचा अवमान करणारी वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा निर्वाणीचा इशाराही यावेळी देण्यात आला.

    कराड : मंत्री छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज बांधवांविरोधात गरळ ओकत आहेत. त्यांनी कराडमध्ये येऊन दाखवावे असे आव्हान देत, आम्ही त्यांना आमची ताकद दाखवू असा सज्जड इशारा आटके या. कराड गावातील सकल मराठा समाज बांधवांनी दिला आहे. त्याचबरोबर भविष्यात पुन्हा मराठा समाजाचा अवमान करणारी वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा निर्वाणीचा इशाराही यावेळी देण्यात आला.

    मंत्री छगन भुजबळ यांच्यासह काही राजकीय नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाज बांधवांबाबत वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्य करत आहेत. या वक्तव्यांचा निषेध नोंदवत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आटके गावातील मराठा समाज बांधव सोमवारी सायंकाळी एकत्र आले होते.

    मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मराठा समाजाबाबत व मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा मराठा समाज बांधवांनी निषेध नोंदवला आहे. मराठा समाज शांत आहे. लोकशाही मार्गाने मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. मात्र मंत्री छगन भुजबळ यांच्यासह काही राजकीय पक्षांचे नेते आपल्या स्वार्थासाठी ओबीसी समाज बांधव व मराठा समाज बांधव यांच्यात गैरसमज निर्माण करून दंगल घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या नेत्यांनी मराठा समाजाबाबत आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत अपप्रचार करणे न थांबवल्यास राज्यातील मराठा समाज बांधवांकडून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी मराठा समाज बांधवांनी दिला.

    महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे
    छगन भुजबळ महाराष्ट्र कोणाचा आहे? असे म्हणत आहेत, याकडे लक्ष वेधत महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे, हे लक्षात ठेवा, असे सुनावत मराठा समाज बांधवांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मराठा समाजाविरोधात बोलणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांचा निषेध नोंदवला.