महात्मा फुले पुण्यतिथीला भुजबळांची दांडी; चुकीच्या कार्यपद्धतीमुळे दांडीची चर्चा

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रित करण्यात आले. मात्र, आयोजकांच्या चुकीच्या नियोजनामुळे त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा सुरु आहे.

    शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रित करण्यात आले. मात्र, आयोजकांच्या चुकीच्या नियोजनामुळे त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे या कार्यक्रमात आयोजकांचे अपुरे नियोजन कारणीभूत होते की आयोजकांचे अपयश असा सवाल उपस्थित केला जात आहे.

    तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आयोजकांकडून प्रमुख उपस्थिती म्हणून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री अतुल सावे यांना निमंत्रित करण्यात आले. परंतु, भुजबळ, सावे या दोघांसह स्थानिक आमदारांनी देखील या कार्यक्रमाला दांडी मारली. माजी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषेदेच्या कृषी व पशु संवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार, काकासाहेब पलांडे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्घाडे, पंचायत समितीचे सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, डॉ. वर्षा शिवले, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार, कात्रज दुध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे आदींसह ठराविक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

    समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना डावलल्याची चर्चा

    आयोजकांकडून माजी उपमुख्यमंत्री भुजबळ, सहकारमंत्री सावे यांच्या फोटोंसह कार्यक्रमाची जाहिरातबाजी करुन लाखो रुपयांची उधळपट्टी केली. मात्र, नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश झाला. कार्यक्रमाच्या आयोजन कमिटीमध्ये समता परिषदेच्या काही नेत्यांना जाणीवपूर्वक विचारात न घेतल्याने माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी दांडी मारली असल्याची चर्चा शिरुर तालुक्यात चांगलीच रंगली आहे.

    सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे

    तळेगाव ढमढेरे येथे आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी सर्व पक्षीय नेत्यांची हजेरी असणार असल्याचे बोलले जात होते. परंतु कार्यक्रमाच्या आयोजकांच्या चुकीच्या नियोजनामुळे सर्व पक्षीय नेत्यांची हजेरी कार्यक्रमाला लागली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम ‘फेल’ झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. कोणताही कार्यक्रम राबविताना सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे असते, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. किमान यापुढे तरी अशा कार्यक्रमाचे आयोजन करताना आयोजक सर्वांना विश्वासात घेतील, अशी अपेक्षा कार्यक्रमस्थळी ऐकायला मिळाली.