घुंगराची बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर; शेतीच्या यांत्रिकीकरणाचा परिणाम

शेतकऱ्‍यांचा मित्र म्हणून ओळखला जाणारा बैल ग्रामीण भागातून गायब होत चालला आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे बैलांमार्फत केली जाणारी शेती कमी झाली असून ट्रॅक्टर, पॉवरटिलर, रोटॅविटरचा वापर वाढला आहे. आधुनिकीकरणामुळे बैलगाडी व बैल जोड्या फक्त शोपीस ठरू लागल्या आहेत.

  कराड : शेतकऱ्‍यांचा मित्र म्हणून ओळखला जाणारा बैल ग्रामीण भागातून गायब होत चालला आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे बैलांमार्फत केली जाणारी शेती कमी झाली असून ट्रॅक्टर, पॉवरटिलर, रोटॅविटरचा वापर वाढला आहे. आधुनिकीकरणामुळे बैलगाडी व बैल जोड्या फक्त शोपीस ठरू लागल्या आहेत.

  पूर्वी ग्रामीण भागातील मुख्य दळणवळणाचे साधन म्हणून बैलगाडी होती. इंधन तसेच यांत्रिक वाहने येण्यापूर्वी याचा वापर शेतमाल वाहण्यासाठी व शेतीतील कामे करण्यासाठी केला जात होता. पूर्वीच्या काळात लग्नाला वऱ्‍हाड घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर होत असे. बैल हा शेतीच्या कामासाठी वापरला जायचा. नांगरणी, कुळवणी, खळ्यावरची मळणी, पेरणी, मोट ओढणे अशा कामासाठी बैलांचा वापर होत होता.

  बैल ठरू लागला कालबाह्य

  कालांतराने याचा वापर शर्यतीमध्ये केला जाऊ लागला. शेतकऱ्यांकडून बैलांचा शेतीसाठीचा वापर कमी झाला. कारखान्यावरील ऊस वाहतुकीसाठी बैलांचा वापर केला जात आहे. ट्रॅक्टरचा वापर करून शेती केली जात असल्याने बैल कालबाह्य ठरू लागला आहे. महाराष्ट्रीयन सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या बेंदूर सणादिवशी शेतकरी बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरची मिरवणूक काढतात. वाढत्या यांत्रिकी साधनांमुळे शेतकऱ्‍यांकडून ही बैलजोडी ट्रॅक्टरला अधिक पसंती दिली जात आहे.

  बैल सांभाळण्याचा खर्च न परवडणारा

  आधुनिक युगात बैलांच्या सहाय्याने शेती करण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. काही शेतकरी शेतीच्या कामापुरतेच बैल घेतात. शेतीची कामे झाल्यानंतर ते विकून टाकतात. त्यामुळे गावात एखादीच बैलजोडी दिसते. त्यातच पावसाच्या लहरीपणामुळे शेती ही वाया जात असल्याने अगोदरच कर्जाच्या बोजाखाली सापडलेल्या शेतकऱ्‍याला बैलांचा खर्च परवडत नसल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहे.