पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल २५ लाखांचा गुटखा केला जप्त

महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा कोंढवा पोलिसांनी छापा कारवाई करून पकडला असून, या छापा कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली. पोलिसांनी पिकअप वाहनासह २४ लाख ८७ हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    पुणे : महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा कोंढवा पोलिसांनी छापा कारवाई करून पकडला असून, या छापा कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली. पोलिसांनी पिकअप वाहनासह २४ लाख ८७ हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई येवलेवाडी येथील पानसरेनगर मधील एका पत्र्याच्या शेड व टेम्पोमध्ये करण्यात आली.

    दिनेश रज्जूराम मालू (वय २३ रा. पानसरेनगर, येवलेवाडी) याला अटक केली आहे. तर प्रकाश प्रेमाराम भाटी (रा. कोंढवा) याच्यावर भादवी कलम ३२८, २७२, २७३, ३४ सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध व व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनिमय अधिनियम कलम ७(२०),२०(२) व अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००६चे कलम २६(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अमोल नवनाथ फडतरे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

    कोंढवा पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पथकाला माहिती मिळाली की, पानसरे नगर गल्ली नं. १० येथे एक पिकअप (एमएच १२ यु एम १३८६) टेम्पो उभारला आहे. त्यात महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास बंदी असलेल्या गुटख्याची पोती आहेत. मिळालेल्या माहितीची खात्री करुन पोलिसांनी छापा टाकला. चालक दिनेश मालू याला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीची झडती घेतली असता जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमधून २४ लाख ८७ हजार ७७१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.