कोयता गँगच्या म्होरक्यालाच केली अटक, इतर साथीदारही अटकेत; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची (Koyta Gang) मोठी दहशत पाहिला मिळत आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी (Pune Police) देखील कंबर कसली आहे.

पुणे : पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची (Koyta Gang) मोठी दहशत पाहिला मिळत आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी (Pune Police) देखील कंबर कसली आहे. असे असताना मीनाताई ठाकरे वसाहतीतील औद्योगिक वसाहतीत दहशत पसरविणारा कोयता गँगचा म्होरक्या सचिन माने (Sachin Mane) आणि त्याच्या साथीदारांना स्वारगेट पोलिसांच्या पथकाने अटक केली.

स्वारगेट पोलिसांनी या गँगवर कारवाई करत सचिन माने (वय २४), अजय डिखळे (वय 24), यश माने (वय 18), अमर जाधव (वय ३२), रोहित जाधव (वय २७), विजय डिखळे (वय १८), मोन्या ऊर्फ सूरज काकडे (वय २६, सर्व रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी), निखिल राकेश पेटकर (वय २२, रा. आईमाता मंदिराजवळ, बिबवेवाडी) या सर्वांना अटक करण्यात आली आहे. शिवाय, आयुष माने, पल्या पासंगे (दोघांचे वय २१ दोघे रा. गुलटेकडी), माया ऊर्फ अभिषेक पाटोळे (वय २२), प्रमोद ऊर्फ पम्या (दोघे रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी आरोपींच्या साथीदारांची नावे आहेत. याप्रकरणात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली.

आरोपींकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

सचिन माने आणि त्याच्या साथीदारांकडून तलवार, कोयते, पालघन असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण गँगविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.