पुणे आरटीओची मोठी कारवाई, तब्बल ५५ खासगी ट्रॅव्हल्सकडून केला दंड वसूल

परराज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदणी करून महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर पुण्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत पुणे ‘आरटीओ’ने अशा ५५ ट्रॅव्हल्स बसवर कारवाई करून दंड वसूल केला आहे.

    पुणे : परराज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदणी करून महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर पुण्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत पुणे ‘आरटीओ’ने अशा ५५ ट्रॅव्हल्स बसवर कारवाई करून दंड वसूल केला आहे.
    पुणे शहरातून दररोज हजारो ट्रॅव्हल्स धावतात. त्यामुळे पुण्यातून इतर शहरांत जाणाऱ्या प्रवाशांची सोय होते; पण काही ट्रॅव्हल्सची नोंदणी इतर राज्यांत करून त्या महाराष्ट्रात चालविल्या जात आहेत. त्यामुळे पुणे आणि राज्याचा महसूल बुडत होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पुणे ‘आरटीओ’ने त्यांच्या ‘भरारी पथका’मार्फत परराज्यात नोंदवून पुण्यात चालविल्या जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा शोध सुरू केला.
    या मोहिमेत पुण्यात ५५ ट्रॅव्हल्स बस या परराज्यात नोंदणी करून महाराष्ट्रात चालविल्या जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार ‘आरटीओ’ने या ५५ ट्रॅव्हल्सवर कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे, अशी माहिती ‘आरटीओ’कडून देण्यात आली.
    काही खासगी ‘ट्रॅव्हल्स’चे चालक परराज्यात बसची नोंदणी करतात. त्या वेळी व्यवसायिक वाहनांचा कर त्या राज्यात भरला जातो; पण त्यानंतर ट्रॅव्हल्सवाले त्या बस महाराष्ट्रातील दोन शहरांदरम्यान चालवितात. त्यामुळे महाराष्ट्राचा कर यात बुडवला जातो. हे लक्षात घेऊन पुणे ‘आरटीओ’ने परराज्यात नोंदणी असणाऱ्या बसवर कारवाई सुरू केली आहे. ‘मोटार वाहन कायद्या’नुसार त्या राज्यात नोंदणी केलेल्या बस त्याच राज्यात चालविल्या जाव्यात. एक शहर नोंदणी केलेल्या राज्यात, तर दुसरे शहर बाहेर असले, तरी चालत होते; पण त्यातही आता बदल करण्यात आला आहे.
    पुणे ‘आरटीओ’च्या ‘भरारी पथका’ने काही दिवसांत परराज्यात नोंदणी केलेल्या; पण राज्यात धावणाऱ्या ५५ खासगी बसवर कारवाई केली आहे. त्यामुळे या खासगी बसवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेदेखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे ‘आरटीओ’कडून स्पष्ट करण्यात आले.