क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये तूफान राडा; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी दगडफेक करून एकमेकांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री 10.30 वाजता झाकीर हुसेन कॉलनी येथे घडली.

    वर्धा : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी दगडफेक करून एकमेकांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री 10.30 वाजता झाकीर हुसेन कॉलनी येथे घडली. ही घटना उघडकीस येताच यावेळी गोंधळ उडाला. पोलिस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    अशोकनगर येथील एका तरुणाने झाकीर हुसेन कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत आपली कार उभी केली होती. त्यावर परिसरातील एका तरुणाने आक्षेप घेत गाडी काढण्यास सांगितले. यावरून झालेल्या वादातून झाकीर हुसेन कॉलनी परिसरात युवकांसोबत मारामारी झाली. काही तरुण अशोक नगर येथील रहिवाशाच्या घरी पोहोचले आणि त्याच्याशी हाणामारी करू लागले. परिस्थिती इतकी वाढली की अशोक नगर व झाकीर हुसेन कॉलनी येथून येणारे लोक एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. पुरुष, महिला आणि तरुणांमध्ये हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेतले.

    घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल

    घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, शहर ठाणेदार रवींद्र शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सायबर सेलचे प्रमुख मंगेश भोयर, सेवाग्रामचे ठाणेदार विनीत घागे यांच्यासह एलसीबीची टीम, डीवायएसपी टीम, डीबी टीमचे शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक पोहोचले होते. मध्यरात्री तीन वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली.

    याप्रकरणी अशोक नगर येथील रहिवासी सिद्धू वीरू राखडे (37) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्याविरुद्ध तर अब्दुल मोहसीन गुलाम मुर्तजा शेख ( (28) रा. झाकीर हुसेन कॉलनी यांच्या फिर्यादीवरून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तणावामुळे घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.