A big development in Maharashtra politics, Raj Thackeray meets Chief Minister Eknath Shinde, fourth Bhidu in the grand alliance?

  Lok Sabha Election 2024, Raj Thackeray Meet Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडते आहे. याचं कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी ताज लँड्स या हॉटेलवर पोहचले आहेत. राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात रात्री उशिरा एक बैठक झाली. त्यापाठोपाठ आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. यामुळे महायुतीत चौथा भिडू येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

  अमित शाह आणि राज ठाकरे भेट
  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे पुत्र अमित ठाकरे होते. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी घेतलेली ही भेट महत्वाची मानली जाते आहे. अशात आता राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचले आहेत. राज ठाकरेंनी घेतलेली ही भेट सूचक मानली जाते आहे. राज ठाकरे जर महायुतीत आले तर महायुतीची ताकद नक्की वाढणार आहे यात काही शंका नाही.
  मनसेसाठी आजची भेट महत्वाची
  महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महायुतीत सहभागी झाली तर मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डी या ठिकाणी जागा दिली जाईल अशी चर्चा आहे. या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात झालेली चर्चाही गुलदस्त्यातच आहे.राज ठाकरे जर महायुतीत आले तर त्यांना लोकसभेच्या जागा दिल्या जातील की विधानसभेसाठी त्यांना जागा सोडल्या जातील हे स्पष्ट झालेलं नाही.

  छगन भुजबळ यांनी काय म्हटलं होतं?
  “राज ठाकरेंना जर बरोबर घ्यायचं असेल तर काही जागा सोडाव्या लागतील. महाविकास आघाडीतही वंचितची चर्चा सुरुच आहे. एकदा वरुन जागावाटप ठरलं की बाकी सगळ्या चर्चा थांबतात. राज ठाकरे आमच्या बरोबर आले तर स्वागत आहे. राज ठाकरे आल्याने महायुतीची शक्ती वाढेल. विधानसभेलाही, महापालिकेलाही हे नातं आणि संबंध उपयोगी पडतील. राज ठाकरे येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे.” असं भुजबळ यांनी म्हटलं होतं.