नगरमध्ये महाविकास आघाडी-महायुतीची ‘बिग फाईट’; पुन्हा मोदी लाट की पवारांची चालणार जादू?

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह गडकरी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह तब्बल डझनभर दिग्गज नेते 'अहिल्यानगर' जिंकण्यासाठी मैदानात उतरले.

  पुणे / दीपक मुनोत : महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह गडकरी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह तब्बल डझनभर दिग्गज नेते ‘अहिल्यानगर’ जिंकण्यासाठी मैदानात उतरले. तर विरोधी महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारासह जयंत पाटील, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे हे स्टार प्रचारक नगर मोहिमेवर दिसल्याने विखे-लंके लढत चुरशीची होणार हे नक्की.

  दरम्यान, देश, धर्म, जात आणि विकासाच्या मुद्यावरून नगरमध्ये पुन्हा मोदी लाट उसळेल की शेतकरी प्रश्नासोबत धनगर, मराठा आरक्षणाला हात घालणाऱ्या शरद पवारांची येथे जादू चालणार, हे पाहण्यासाठी ४ जूनची उत्कंठा असणार आहे.

  नगर म्हटलं की विखे -गडाख, विखे-थोरात यांचा पारंपरिक संघर्ष आलाच, त्यात विखेंविरोधातील या संघर्षाला शरद पवारानी खऱ्याअर्थाने धार दिली. यशवंतराव गडाख विरोधात बाळासाहेब विखे लढतीनंतर गत निवडणुकीतही शरद पवारांनीच सुजय विखेंसाठी नगरची जागा सोडण्यास नकार दिल्याने हा संघर्ष राज्याला पुन्हा पहायला मिळाला. परिणामी पुत्राच्या उमेदवारीसाठी राधाकृष्ण विखेनाही हयात विरोधात घालवलेल्या भाजपात प्रवेश करावा लागला होता.

  आजही महायुतीकडून डॉ. सुजय विखे पाटील हे उमेदवार असताना नीलेश लंके या तुल्यबळ उमेदवाराला मैदानात उतरविणारे दुसरे तिसरे कोणीच नसून, ते शरद पवार हेच दिसले. शिवाय प्रचारातही शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा पहायला मिळाल्याने या निवडणुकीलाही विखे-पवार अशीच झालर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  महायुतीत अंतर्गत नाराजी

  नगर लोकसभा मतदार संघात शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड असे सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. एकूण मतदार संख्या 19,81,866 इतकी आहे. 25 उमेदवार नशीब आजमावत आहे, महायुतीकडून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात आहेत. तर त्यांच्याविरोधात नाट्यमय घडामोडीनंतर पारनेरचे शरद पवार गटाचे नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मविआची उमेदवारी घेतली आहे.

  विखे पाटलांनी सोशल माध्यमांसह गावोगावी सभा, मेळावे, बैठका घेऊन प्रचारावर जोर दिला. याकामी ʻप्रवरा पॅटर्न ʼपुरेपूर वापरला गेला आहे. पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यातही विखें पितापुत्रांना यश आले आहे, अर्थात यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागल्याचे लपून राहिले नाही. मात्र, ही नाराजी खरंच दूर झाली का, हाही एक विषय आहेच.

  दुसरीकडे नीलेश लंके यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशाच स्वाभीमान जनसंवाद यात्रेतून केला आहे. त्यांनीही पायाला भिंगरी बांधून मतदार संघाची हवा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात मविआत फूट पडून खुद्द पारनेरमध्ये ठाकरे गटाचे विजय औटी विरोधात गेल्याने लंकेची डोकेदुखी वाढल्याचे दिसते. त्यामुळे दोन्ही उमेदवारांपुढे अंतर्गत गटबाजीचे आव्हान असले तरी विखेंकडे प्रवेरेची यंत्रणा असून शेवटच्या दोन दिवसात काय आणि कशी बेरीज करायची याचे तंत्रज्ञान आहे, मात्र लंकेनाही संगमनेरसह अनेक छुपे हात आपल्यासाठीं कामाला लागल्याची खात्री आहे, त्यामुळें दोघाकडून विजयाचा दावा केला जात आहे.

  वास्तविक, महायुतीकडे श्रीगोंदा आमदार बबनराव पाचपुते, शेवगाव पाथर्डी आमदार मोनीका राजळे आणि अजित पवार गटाचे नगर शहरातून संग्राम जगताप हे तीन आमदार आहेत. याशिवाय विधानपरिषदेतून आलेले आमदार प्रा. राम शिंदे यांचीही ताकद विखेंना भेटेल अशी चर्चा आहे. तर महाविकास आघाडीकडे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि पारनेरमध्ये स्वतः नीलेश लंके हे तीन आमदार आहेत. त्यामुळे दक्षिणेत महायुती आणि महाविकास आघाडीची ताकद तुल्यबळ अशीच आहे. म्हणूनच एक हायव्होल्टेज सामना म्हणून संपूर्ण राज्यातील जनता या लढतीकडे पाहते आहे.

  मोदी-पवार मैदानात !

  देशाचे पतंप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पंकजा मुंडे हे देखील नगरच्या रणांगणात उतरलेले दिसले, ‘शिर्डी’त आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विखेंसाठी दक्षिणेतील शिवसैनिकांना मेसेज दिला आहे. त्यामुळे महायुतीने नगरच्या लढतीची प्रतिष्ठा आणखी वाढविल्याचे बोलले जाते तर मविआचे उमेदवार लंके यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वयाच्या 84 व्या वर्षी ‘दक्षिण नगर’ पिंजून काढला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, सुनील केदार, सुषमा अंधारे या स्टार प्रचारकानी जणू नगर काबीज करण्याचा विडा उचलल्याचे दिसले.विशेष म्हणजे मोदी नगरमध्ये येऊन गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार आजारी असतानाही पुन्हा नगरात सक्रिय झाले.

  प्रचारात गाजले ‘हे’ मुद्दे

  नगर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अखेर काल शनिवारी संपला. महायुतीकडून सभा, मेळाव्यातून 10 वर्षात केलेली कामे सांगतानाच काँग्रेस, शरद पवार, ठाकरेंना लक्ष्य केले तर देश, धर्म आणि जातीवर अधिक फोकस केल्याचे दिसले. मविआकडून थेट मोदींना टार्गेट करताना शेतकरी प्रश्न, मराठा, धनगर आरक्षण या कळीच्या मुद्यांनाही चातुर्याने हात घातला गेला, मात्र नगरकरांना नेमके कोण भावले, हे निकालानंतर समजणार आहे.

  विखे-थोरात सख्खे शेजारी

  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सुजय यांच्यासाठी तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लंकेच्या विजयासाठी नगरमध्ये व्यूहरचना आखल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी नगरमध्ये लक्ष केंद्रीत केले असून प्रचारात एकमेकांवर तोफ डागण्यातही हे सख्खे शेजारी विसरलेले नाहीत.

  धनगर, मराठ्यांचा मूड काय?

  सध्या धनगर मराठा आरक्षणाचा विषय भावनिक बनला आहे. त्यात नगरमध्ये मराठा मतदार निर्णायक आहे, मात्र विखे आणि लंके हे दोन्ही मराठा चेहरे असल्याने येथील मराठा मतदारांचा मूड सध्या तरी ओळखणे अवघड दिसते.