पत्राचाळ प्रकरणात मोठी माहिती आली समोर, ईडीच्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख

या प्रकरणामध्ये ज्या काही घडामोडी घडत होत्या त्यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना माहिती होती, असे देखील सांगण्यात आलं आहे.

    मुंबई : ईडीने (ED) चार दिवसांपूर्वी पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतां विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. आता या आरोपपत्रातून नव नवीन माहिती समोर येत आहे. 2006-2007 या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकासांच काम देण्याबाबच चर्चाही झाली. त्यानंतर या प्रकरणात 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं चार्जशिटमध्ये उल्लेख असल्याचीही माहिती समोर आली आहे.

    या प्रकरणामध्ये ज्या काही घडामोडी घडत होत्या त्यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना माहिती होती, असे देखील सांगण्यात आलं आहे. आरोप पत्रात माजी मुख्यमत्र्याचं नाव समोर आलं असलं तरी ते माजी मुख्यमंत्री कोण होते हे मात्र, ईडीने आरोपपत्रात नमूद केलेलं नाही. दरम्यान, आत या माहिती नंतर खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. 1039 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार झाल्याचे म्हणत यात राऊतांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. सध्या पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे 4 ऑक्टोबरपर्यंत राऊतांना न्यायलयीन कोठडीतचं राहावे लागणार आहे. यामुळे राऊतांना जामीनावर बाहेर येण्यापासून दिलासा मिळण्यास अडचणी होताना दिसत आहे.