पुण्यात गुंतवणुकीचा मोठा घोटाळा; शेकडो जणांची जवळपास 300 कोटींची फसवणूक

पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आली असून, शेकडो नागरिकांची जवळपास ३०० कोटी रुपयांची फसवणूक (Fraud of Crores) केल्याचा अंदाज आहे.

पुणे : पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आली असून, शेकडो नागरिकांची जवळपास 300 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud of Crores) केल्याचा अंदाज आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या खासगी वित्तीय संस्थेकडून फसवणूक झाली आहे.

याप्रकरणी सेल्वाकुमार नडार (रा. कोंढवा खुर्द) याच्यासह साथीदारांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन पुरुषोत्तम पवार (रा. वाघोली) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी नडार आणि साथीदारांनी अष्टविनायक इन्व्हेस्टमेट नावाने खासगी वित्तीय संस्थेचे कार्यालय लष्कर भागातील न्यूक्लिअस मॉल परिसरात सुरू केले होते. नडार व साथीदारांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखविले. आकर्षित करण्यासाठी योजना मांडल्या होत्या. काही जणांना त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखविले. कर्ज मंजूरी प्रक्रियेसाठी नडार याने पैसे उकळले होते.

पवार यांचा विश्वास संपादित करुन त्यांना कर्ज उपलब्ध करुन दिले. तक्रारदाराच्या खात्यावर जमा झालेली ४० लाख ८९ हजार १५२ रुपये नडारने अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटच्या खात्यात जमा करुन घेतली. पवार यांच्यासह २०० जणांकडून वेगवेगळी कारणे सांगून ३०० कोटी रुपये उकळल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर तपास करत आहेत.

अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या खासगी वित्तीय संस्थेतील प्रतिनिधी गुंतवणूकादारांकडून पैसे घेऊन ते शेअर बाजार, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे. गुंतवणूक करण्यात आलेल्या रक्कमेतून मिळालेल्या नफ्यातील काही हिस्सा गुंतवणूकादारांना दिला जायचा तसेच एखाद्याला कर्ज उपलब्ध करुन दिल्यास काही हप्ते फेडले जायचे. ज्यांनी गृहकर्ज, वाहन कर्ज घेतले आहे. अशा कर्जदारांशी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटच्या प्रतिनिधीकडून संपर्क साधला जात होता.