Hoarding Collapsed

    पिंपरी : मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानंतर महाकाय होर्डींग कोसळल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यामधून सावरत नाही तोच पिंपरी-चिंचवडमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. मोशीमध्ये हे होर्डिंग कोसळल्याचं कळतंय. यात चार गाड्या होर्डिंगखाली दबल्या केल्या आहेत. त्यामुळे गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेले नाही. घाटकोपरमधील घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ लोकांचा मृत्यू झाला होता.

    रस्त्याच्या कडेला असलेले होर्डिंग कोसळले

    पिंपरी चिंचवडमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. शिवाय, जोराचा वारादेखील वाहू लागला आहे. त्यातच सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोशीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेले होर्डिंग कोसळले. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर न पडता विरुद्ध बाजूला पडले. होर्डिंगच्या बाजूला उभ्या असलेल्या चार वाहनांवर हे होर्डिंग पडले. यात वाहनांचे नुकसान झाले आहे.

    अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम सुरु

    मिळालेल्या माहितीनुसार, वाहने पार्क केलेली होती. त्यामुळे वाहनामध्ये कोणीही नव्हतं. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महापालिकेकडून यासंदर्भातील अधिक माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, घाटकोपरमधील घटनेनंतर मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम सुरु झालेले आहे. मोशीतील पडलेले होर्डिंग अनधिकृत होते का? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.