मोठी बातमी! शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे अडीच लाख कोटी पाण्यात

Share Market Closing Bell : आज शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स तब्बल 800 अंकांनी घसरल्याने, गुंतवणूकदारांचे तब्बल 2.5 लाख कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

  मुंबई : आज, बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) चौफेर विक्री दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance) आणि एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसून आली. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. आज दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 800 अंकांची घसरण दिसून आली. आज अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीआधी भारतीय शेअर बाजारावर दबाव असल्याचे दिसून आले.

  शेअर बाजारात मोठी घसरण

  आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1.18 टक्के अर्थात 1.18 टक्क्यांच्या घसरणीसह 66,800 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 231.90 अंकांनी घसरून 19,901 अंकांवर स्थिरावला.

  30 पैकी फक्त 7 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी

  सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी फक्त 7 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. सर्वाधिक घसरण एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात दिसून आली. एचडीएफसीमध्ये 3.90 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, जेएसडब्लू स्टीलमध्ये 2.56 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर दरात 2.18 टक्क्यांची घसरण दिसून आली. टाटा स्टीलमध्येही 1.46 टक्क्यांची घसरण झाली.

  मिड कॅप, पीएसयू आणि स्मॉल कॅप पीएसयूमध्ये घसरण
  आज दिवसभरातील व्यवहारात शेअर बाजारात घसरण दिसून आली. मिड कॅप पीएसयूमध्ये त्या तुलनेत कमी घसरण दिसून आली. पॉवर शेअर्समध्ये फारशी तेजी दिसून आली नाही. साखर उद्योगाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स आणि टेक्सटाइल्स सेक्टरसाठी आज फारसं सकारात्मक वातावरण दिसून आलं नाही.

  गुंतवणूकदारांचे 2.5 लाख कोटी पाण्यात
  मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 20 सप्टेंबर रोजी 320.66 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे. त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 18 सप्टेंबर रोजी 323 लाख कोटी रुपये होते. आज झालेल्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 2.34 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
  बाजारात सकाळपासून पडझड
  शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच काही बँकिंग आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स पडले. यामध्ये विप्रो ते इन्फोसिस आणि कोटक महिंद्रा बँक ते आयसीआयसीआय बँकेपर्यंतच्या शेअर्सचा समावेश होता.
  भारत-कॅनडा वादाचा परिणाम?
  कॅनडा पेन्शन फंड इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIN) नं अनेक भारतीय कंपन्यांमध्ये अंदाजे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. सुमारे 30 भारतीय कंपन्या आहेत, ज्यांचा व्यवसाय कॅनडामध्ये पसरलेला आहे आणि त्यांनी 40 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशातील तणाव वाढल्याने या कंपन्यांवरील संकटही वाढू शकतं.