पुणे पोलिसांची मोठी कारवाई, बेकायदेशीर कोयत्याचा साठा पकडला; तब्बल १०५ कोयते जप्त

गुन्हे (Crime) शाखेच्या युनिट एकने बोहरी आळीतील एका हार्डवेअर व्यावसायिकाच्या दुकानावर छापा टाकून कोयत्याचा मोठा साठा जप्त केला आहे. तब्बल १०५ कोयते पोलिसांनी जप्त केले असून, ते बेकायदेशीर असल्याचे पोलिसांकडून ( Police) सांगण्यात आले आहे.

  पुणे : कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असल्याने पुणे पोलीस (Pune Police) आता अॅक्शन मोडवर आले असून, कोयत्याने दहशत माजविणाऱ्यांसोबतच आता कोयते विकणाऱ्यांवर देखील कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. गुन्हे (Crime) शाखेच्या युनिट एकने बोहरी आळीतील एका हार्डवेअर व्यावसायिकाच्या दुकानावर छापा टाकून कोयत्याचा मोठा साठा जप्त केला आहे. तब्बल १०५ कोयते पोलिसांनी जप्त केले असून, ते बेकायदेशीर असल्याचे पोलिसांकडून ( Police) सांगण्यात आले आहे. कारवाईत पोलिसांनी हुसेन खोजेमा राजगारा (वय ३२, रा. उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट ४/२५ व मपोकाक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले व पथकातील अजय जाधव, अजय थोरात, अमोल पवार, निलेश साबळे, राहुल मखरे, दत्ता सोनवणे, शशिकांत दरेकर, विठ्ठल साळुंखे, बाबर व त्यांच्या पथकाने केली आहे.

  शहरात कोयत्याचा वापर करुन रस्त्यांवर दहशत माजविण्याचे तसेच लुटामारीचे प्रकार वाढले आहेत. त्यातही कोयता घेऊन स्वंयघोषित भाईंकडून दहशत माजविली जात आहे. हाणामारीत कोयत्याचा सरास वापर केला जात आहे. तोडफोड व इतर गुन्ह्यात देखील कोयत्याचा वापर होत असल्याने “कोयता” हत्यार प्रसिद्ध झाले आहे.

  पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कोयता गँगवर कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर आता पोलिसांकडून टवाळखोर तसेच गुन्हे करणाऱ्यांवर गुन्ह्यांसोबतच पोलीस खाक्या दाखवत कारवाई केली जात आहे. मात्र, कोयता नेमका इतका सहज मिळतो कसा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. त्यानूसार पोलिसांनी कोयते विक्रेते व त्याबाबतची माहिती घेण्यास सुरूवात केली होती. यादरम्यान, युनिट एकच्या पथकाला भोरी आळीतील चिरार गल्लीत हार्डवेअरचे दुकानात कोयते असल्याचे समजले होते.

  त्यानूसार, पोलीस निरीक्षक संदिप भोसले व त्यांच्या पथकाने या दुकानावर छापा कारवाई केली. त्यावेळी येथे नवीन विक्रीसाठी ठेवलेले तब्बल १०५ कोयते मिळाले. पोलिसांकडून त्याची पाहणी केली असता ते बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे. कोयत्याचा पाता मोठा असून, तो फार्मर किंवा व्यावसायासाठी उपयोगात येणाऱ्या कोयता सारखा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानूसार राजगारा यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

  कोयते आले कोठून अन् विक्री कोठे…

  पुणे पोलिसांनी १०५ कोयते जप्त केल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली असून, कोयते विक्रेत्यांची भंबरी उडाली आहे. दरम्यान, हा कोयता नियमानुसार नसल्याचेही समोर आले आहे. राजगारा याने हा कोयता कोठून आणला व तो कोणाला विक्री केला जाणार होता, याची माहिती घेतली जात आहे. तर, यापुर्वी कोयते कोणाला विकले किंवा नेले आहेत, याचीही माहिती आता पोलीस घेत आहेत. हा कोयता मोठा आहे. कोयत्याचे पाते पसरट आणि एकदम जाड व धार असणारे आहे. शेतकरी किंवा दुकानदार व इतरांना लागणारा कोयता हा असा नसल्याचे पोलिसांकडून सांगितले गेले आहे. त्याची पात कमी व वजनाला हलका असतो.

  शहरातील पावणे चार हजार गुन्हेगारांची झाडाझडती..!

  शहरात होऊ घातलेल्या ‘जी २०’ परिषद तसेच पोलीस क्रिडा स्पर्धेच्या तसेच दहशत माजविण्याच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्नामुळे पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची मध्यरात्री विशेष मोहीम राबवत पावणे चार हजार गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. मोहिमेत पोलिसांनी ६९८ गुन्हेगार राहत्या पत्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले असून, सराइत गुन्हेगारांकडून पिस्तुले तसेच कोयते जप्त केले आहेत. शहरात राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा होत आहे. तर, पुढील आठवड्यात जी २० परिषद होत आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरात विशेष मोहिम राबवली. हॉटेल तसेच लॉज, एसटी स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात तपासणी करण्यात आली. कारवाईत बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी ४३ जणांना अटक केली. तर, त्यांच्याकडून १४५ कोयते, तलवार असा शस्त्रसाठा जप्त केला. तर कोंढव्यातील बेकायदा हुक्का पार्लरवर छापा कारवाई केली.