पाटस पोलिसांची मोठी कारवाई ; बेकायदा गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक

दौंड तालुक्यातील पाटस येथे बेकायदा गुटखा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पाटस पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.

    पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे बेकायदा गुटखा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पाटस पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली‌.

    आरिफ राजूवल्ली पठाण (रा. पंचशील नगर, पाटस, ता दौंड,जि पुणे) असे या बेकायदा गुटखा विक्रेत्याचे नाव आहे. पाटस परिसरात पान टपऱ्या व इतर दुकानात बेकायदा गुटखा विक्री होत असल्याची माहिती पाटस पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास बंडगर , पोलीस शिपाई गणेश मुटेकर, हनुमंत खटके आदींनी कारवाई केली.

    बुधवारी (दि. 10) सायंकाळी पाटस – कानगाव रोडवर असलेल्या ओढयाजवळ दुचाकी वरुन जात असताना एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे मानवी जीवितास अपायकारक असलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या बेकायदा गुटख्याच्या पुढ्या मिळून आल्या. या पुड्यांमध्ये २४ हजार किमतींचे एम.सेंन्टेड श तंबाखू गोल्ड नावाचे ४० बॉक्स, ३६ हजार किमतीच्या प्रीमियम आर एम डी पान मसाल्याचे ४० बॉक्स अशा विविध कंपनीचा गुटखा आणि ४० हजार किमतीची मोटर सायकल असा एकूण एक लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस शिपाई हनुमंत खटके यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अन्नसुरक्षा अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले.