नेस्ले इंडिया कंपनीला मोठा दिलासा, ९ वर्षांनंतर ६४० कोटी दंड भरावा लागणार नाही

राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) २०१५ मध्ये सरकारकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. ग्राहक व्यवहार विभागाने नेस्ले इंडिया लिमिटेडविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

    काही वर्षांपूर्वी मॅगी नूडल्समध्ये शिशासारखे घातक रसायन पदार्थ असल्याचा आरोप ग्राहक व्यवहार विभागाकडून करण्यात आला होता. मात्र आज ९ वर्षांनंतर नेस्ले इंडिया लिमिटेड कंपनीला दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) २०१५ मध्ये सरकारकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. ग्राहक व्यवहार विभागाने नेस्ले इंडिया लिमिटेडविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यामुळे कंपनीला ६३९ कोटीहून अधिक रक्कमेची भरपाई मागण्यात आली होती.

    नेस्ले इंडिया लिमिटेडविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावल्याने FMCG कंपनीला मोठा दिलासा मिळाला होता. स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने ही माहिती दिली होती. तसेच हा निर्णय २ एप्रिलला एनसीडीआरसीने दिला होता, त्याची प्रत बुधवारी दिली जाणार आहे. नेस्ले इंडिया लिमिटेडने सांगितल्यानुसार, केंद्र सरकारच्या ग्राहक विभागाने २०२५ मध्ये NCDRC कडे याचिका दाखल करत कंपनीने धोकादायक-दोषयुक्त घटक असलेले मॅगी नूडल्स तयार करून लोकांना विकल्याचा आरोप केला होता. मॅगी नूडल्समध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त रसायनांचा वापर केल्याचा देखील आरोप केला आहे.

    नेस्ले कंपनीवर करण्यात आलेल्या आरोपानंतर सरकारने नेस्ले कंपनीकडून २८४.५५ कोटी रुपये भरपाई आणि ३५५.४१ कोटी रुपयांची दंडात्मक नुकसान मागितले होते. त्यानंतर आता ९ वर्षांनी ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. २०१५ मध्ये मॅगीवर केलेल्या आरोपानंतर मॅगी बाजारातून गायब झाली होती. मॅगी नूडल्समध्ये धोकादायक रसायनांचा वापर केल्याचा आरोप केल्यानंतर उत्पादनावर ६ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. कंपनीला बाजारातून सुमारे ३८,००० टन नूडल्स परत मागवून घ्यावे लागले होते. या कारवाईनंतर कंपनीचे मोठे नुकसान झाले. नंतर मॅगीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतर मॅगी पुन्हा बाजारात दिसू लागली.

    नेस्ले इंडिया कंपनीला दिलासा दिल्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये चांगली तेजी दिसून आली. १९ रुपयांच्या वाढीसह २,५६८ रुपयांवर कंपनीचे शेअर्स बाजरात व्यवहार करताना दिसून आले. दुपारच्या सुमारास कंपनीचे शेअर्स काही प्रमाणात घसरले होते.