
ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray Group) हे नाव आणि मशाल हे चिन्ह आता तूर्तास वापरण्याची परवानगी मिळाल्याचे समजते. त्यामुळं ठाकरे गटाला दिलासा मिळाल्याचं बोललं जातंय.
मुंबई- शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गटाने (Shinde Group) बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. यानंतर शिंदे गट व ठाकरे गट (Thackeray group) कोणत्या ना कोणत्या कारणावरुन आमनेसामने येत आहे. एकिकडे पक्ष व चिन्ह यांचा निकाल न्यायालयाने शिंदेंच्या शिवसेनेला दिला आहे. तर सत्तासंघर्षाची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असताना शिंदे गट व ठाकरे गट यांच्याकडून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु असतानाच आता ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray Group) हे नाव आणि मशाल हे चिन्ह आता तूर्तास वापरण्याची परवानगी मिळाल्याचे समजते. त्यामुळं ठाकरे गटाला दिलासा मिळाल्याचं बोललं जातंय.
निकाल येईपर्यंत…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच म्हणजेच 26 फेब्रुवारीपर्यंत वापरता येणार होते. निवडणूक आयोगाने तशी ऑर्डरच काढली होती. मात्र, आता सत्तासंघर्षाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत पक्षचिन्ह आणि नाव ठाकरे गटाला वापरता येणार असल्याची माहिती समोर येत आहे. रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना म्हणत धनुष्यबाणावर दावा केला. तेव्हा निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह दिले. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीही हेच चिन्ह वापरण्याची मुभा मिळाली होती.
मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या ‘धगधगती मशाल’ चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षानेही दावा केला होता. 1996 पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पक्षाने निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली होती. इतकेच नव्हे तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणाही पक्षाने केली होती.