चित्रा वाघ यांना दिलासा, मरीन ड्राइव्ह ठाण्यात दाखल गुन्ह्यातून दोषमुक्त

"वा रे बहाद्दर मुंबई पोलिस..! भाजप कार्यकर्ते, नेते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठीच तुमची बहाद्दरी शिल्लक राहिली. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा. ज्यांनी राज्यातील हजारो बलात्कारपिडीतांची थट्टा राज्यपालांना लिहीलेल्या पत्रात उडवली आहे. ही षंढ सरकारची षंढ यंत्रणा, असे म्हणत त्यांनी खुले आव्हान दिले होते.

    मुंबई – भाजपच्या राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, आमदार मनीषा चौधरी, भारती लवेकर यांना मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दोषमुक्त करण्यात आले आहे. गिरगाव ४० वी एमएम कोर्टात दंडाधिकारी एन.ए. पटेल यांनी आदेश पारित केले आहेत.

    राज्यात सप्टेंबर २०२१ मध्ये महिलांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन न घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली होती. मंत्रालय इमारतीच्या आवारात घडलेली ही घटना असून त्यानंतर चित्रा वाघ यांच्यासह इतर दोघींनाही पोलिसांकडून नोटीस देण्यात आली होती. तसेच या प्रकरणात मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंदही (पोलिस केस/११९/२०२२) एफआयआर क्र. (२५/२०२१) करण्यात आली होती. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करीत मुंबई पोलिस आणि ठाकरे सरकारवर टीका केली होती.

    “वा रे बहाद्दर मुंबई पोलिस..! भाजप कार्यकर्ते, नेते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठीच तुमची बहाद्दरी शिल्लक राहिली. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा. ज्यांनी राज्यातील हजारो बलात्कारपिडीतांची थट्टा राज्यपालांना लिहीलेल्या पत्रात उडवली आहे. ही षंढ सरकारची षंढ यंत्रणा, असे म्हणत त्यांनी खुले आव्हान दिले होते.

    साकीनाका बलात्कार प्रकरणानंत राज्यात खळबळ निर्माण झाली होती. या प्रकरणी चित्रा वाघ यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले होते. या पत्राची चर्चा देशभर झाली. पीडितेवर बलात्कार आणि हत्येच्या या घटनेबद्दलच्या भयंकर परिस्थितीमुळे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राज्यापालांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना केली होती.