प्रवाशांना मोठा दिलासा, छत्रपती संभाजीनगरात बस धावू लागल्या; इंटरनेट सेवाही झाली सुरू

मराठवाड्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याने कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे.

    छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येत होतं. मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याने कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. सोबतच, चार दिवसांनंतर एसटी बसेस पुन्हा एकदा रस्त्यावर धावताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले होते. मात्र, सरकारकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने आणि जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याने राज्यभरात आंदोलनं सुरू झाली. बीड जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना समोर आल्या. त्यामुळे बीडसह धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली होती. यासोबतच संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच एसटी सेवा देखील थांबवण्यात आली होती.

    एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता सरकारने गुरुवारी एक शिष्टमंडळ पाठवत जरांगे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर जरांगे यांनी सरकारला आणखी दोन महिन्याची मुदत दिली आहे. तसेच जरांगे यांनी आपलं उपोषण देखील मागे घेतलं आहे. जरांगे यांचा उपोषण सुटल्याने प्रशासनाने देखील सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तसेच बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तर, एसटी बस सेवा देखील पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

    सरकार विशेष अधिवेशन घेणार

    मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात गेलं. त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ८ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही आश्वासन दिलं. जरांगे पाटलांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणानंतर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करुन त्यांचं उपोषण सोडलं.