आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट; सुनावणीवेळी नेमके काय घडले? पाहा सविस्तर रिपोर्ट

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे गटाचे वकील यावेळी युक्तिवाद करीत आहेत. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. यावेळी दोन्ही पक्षांच्या वकिलांनी आपआपल्या पक्षाची बाजू मांडली. यावर आता विधानसभा अध्यक्ष आपले मत व्यक्त करतील.

  मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी आज सुनावणी सुरू झाली. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. शिंदे गटाकडून अनिल सिंग हे तर ठाकरे गटाकडून वकील असीम सरोदे हे बाजू मांडत आहेत. यावेळी दोन्ही गटाने आपलाच पक्ष कसा कायदेशीर असल्याचे विधानसभा अध्यक्षांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे एक मोठी गोष्ट लक्षात आणून दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्या गोष्टीची गंभीर दखल घेतली आहे.

  आम्हाला दोन आठवड्यांची मुदत द्यावी

  शिंदे गटाचे वकील अनिल सिंग यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुनावणीच्यावेळी जे झाले ते मीडियासमोर सांगितले. आम्हाला सुनील प्रभू यांच्याकडील कागदपत्रे मिळाली नाहीत. तसेच, आमच्याकडचे कागदपत्रेही त्यांना मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला दोन आठवड्यांची मुदत द्यावी, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. गणपती उत्सव असल्याने अनेक आमदार गावाकडे जात असतात. त्यामुळे दोन आठवड्यांची ही मुदत असावी, अशी मागणीही आम्ही विधानसभा अध्यक्षांना केली होती, असे अनिल सिंग यांनी सांगितले.

  दोन आठवड्यांचा वेळ
  दरम्यान, शिंदे गटाची ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. आजपासून दोन आठवड्यांत रिप्लाय फाईल करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. तसेच, दोन आठवड्यांत फाईल एक्सचेंज करण्यासही सांगितले आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

  त्यानंतर रेग्युलर सुनावणी
  आजची पहिली तारीख होती. सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. आम्हाला कागदपत्र मिळावे, अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्षांना केली. ती मान्य झाली आहे. आता पुढची तारीख मिळणार आहे. त्यानंतर केस कशी चालेल याचा कार्यक्रम ठरेल. नंतर रेग्युलर प्रोसेडिंग सुरू राहील, असं अनिल सिंग यांनी सांगितलं.

  एकाच याचिकेवर सुनावणी
  आज फक्त एकाच याचिकेवर सुनावणी झाली. एकनाथ शिंदे यांच्या एकाच याचिकेवर सुनावणी झाली. शिंदे हेच प्रतिवादी होते, अशी माहितीही त्यांनी दिली.