भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; जोरदार धडक मारूनही कारचालक तसाच सुसाट…

सुकळी स्टेशन येथून दुचाकीने जात असलेल्या तरुणाला समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकीने धडक दिली. यात अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी (ता.22) सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास सेलू सुकळी स्टेशन मार्गावर घडली.

    सेलू : सुकळी स्टेशन येथून दुचाकीने जात असलेल्या तरुणाला समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकीने धडक दिली. यात अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी (ता.22) सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास सेलू सुकळी स्टेशन मार्गावर घडली. अमोल दयाराम वाढवे (वय 30, रा. खरांगणा गोडे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हा बहिणीकडे सुकळी स्टेशन येथे आला होता. नियोजित काम आटोपून गावी खरांगणा गोडे येथे दुचाकीने जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान सेलू सुकळी स्टेशन मार्गावर समोरून भरधाव येणाऱ्या झायलो कारने दुचाकीला धडक दिली. त्यात अमोल रोडवर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

    घटना घडताच कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. धडक मारून पळालेली पांढऱ्या रंगाची एमएच 42 झायलो गाडी असून ती घोराड येथील असल्याचे सांगण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच रुग्णवाहिकेतून प्रज्वल लटारे याने सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तो मृत पावल्याचे सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सेलू पोलिस करीत आहेत.