घटस्फोटाला जबाबदार असल्याच्या संशयातून जन्मदात्या आईचा केला खून; मुलगा पोलिसांच्या ताब्यात

खडकीतील रेंजहिल परिसरात राहत्या घरात ५५ वर्षीय आईचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करून मुलगा पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

    पुणे : खडकीतील रेंजहिल परिसरात राहत्या घरात ५५ वर्षीय आईचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करून मुलगा पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलाचा घटस्फोट झाला होता. तो घटस्फोट आईमुळेच झाला, असा राग त्याच्या मनात होता. त्यावरून त्याने खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

    गुंभाबाई शंकर पवार (वय ५५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलगा ज्ञानेश्वर शंकर पवार (वय ३५) याला ताब्यात घेतले आहे.

    गुंभाबाई पवार या मुलगा ज्ञानेश्वर याच्यासोबत रेंजहिल येथील १३/२ येथील टाईप टू येथे राहत होत्या. दरम्यान, ज्ञानेश्वर याचा चार वर्षांपुर्वी घटस्फोट झाला आहे. तो एचई फॅक्टरी येथे नोकरी करत होता. दरम्यान, आज सकाळी त्यांच्या घरात ज्ञानेश्वर याचा मित्र गेला होता. त्याने घरात पाहिले असता ज्ञानेश्वरची आई गुंभाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी लागलीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

    खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिघावकर व त्यांच्या पथकाने येथे धाव घेतली. तेव्हा घरातील एका खोलीत त्यांना गुंभाबाई यांचा मृतेदह दिसून आला. खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. गुंभाबाई यांच्या मानेवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. चौकशी केली असता त्या मुलगा ज्ञानेश्वर याच्यासोबत राहत असल्याचे समजले.

    पोलिसांनी ज्ञानेश्वरचा शोध घेतला. परंतु, तो मिळाला नाही. त्यामुळे खून त्यानेच केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी पथके रवाना केली. काही तासातच पोलिसांनी ज्ञानेश्वरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.