मनसेच्या मतासाठी राज ठाकरेंना साकडे

    महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपने धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. सध्या मविआ आणि भाजपचे सर्व आमदार विविध ठिकाणी रिसॉर्ट्सवर दाखल झाले आहेत. एकही मत फुटू नये यासाठी सर्व पक्ष काळजी घेत आहेत. मात्र, यादरम्यान भाजपने वेगळी खेळी खेळायला सुरुवात केली आहे.

    देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याने त्यांच्या फिरण्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे भाजपच्या वतीने प्रसाद लाड यांना मुंबईतील आमदारांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, गिरीश महाजन यांच्यावर उर्वरित राज्यातील आमदारांना गळाला लावण्याची जबाबदारी आहे. महाजन यांनी तात्काळ पालघरच्या हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपसाठी संकटमोचन होण्याचे काम ते करत आहेत.

    आशिष शेलार तातडीने दिल्लीला रवाना झाले. यानंतर त्यांनी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. आज सकाळीच ते राज ठाकरे यांच्या ‘शिवतिर्थ’ बंगल्यावर दाखल झाले. राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकमेव आमदार आहे. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. अद्याप मनसेच्य़ा मतासाठी त्यांना महाविकास आघाडीकडून कोणीही संपर्क केला नव्हता. त्यामुळे भाजपने संधी साधत मनसेचे एकमेव मत स्वतःकडे ओढून घेतल्याचे दिसते.

    अलिकडच्या काळात मनसे आणि भाजपमध्ये हिंदूत्वावरून बैठका वाढल्या आहेत. येणाऱ्या निवडणुका दोन्ही पक्ष सोबत लढण्याची शक्यता आहे. मनसेचे एकमेव मत भाजपच्या धनंजय महाडिक यांना द्यावे, म्हणून भाजपतर्फे प्रयत्न सुरू आहेत यासाठी आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.