महापालिकेवर भाजपची जोरदार निदर्शने; पालिकेत घुसण्याचाही कार्यकर्त्यांचा प्रयत्न

जानेवारी महिन्यात भाजपने कचरा घोटाळा उघडकीस आणला होता. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचरा विनाप्रक्रिया बावड्यातील अनेक शेतांमध्ये टाकल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पंचनामा करून त्यात ही बाब स्पष्ट केली होती.

    कोल्हापूर : सहा महिन्यांपूर्वी भाजपने उघडकीस आणलेल्या कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ भाजपने बुधवारी महानगरपालिकेवर जोरदार निदर्शने (BJP Demonstrations on Kolhapur Municipal Corporation) केली.

    राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अधिकारी लवकर भेटावयास न आल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

    जानेवारी महिन्यात भाजपने कचरा घोटाळा उघडकीस आणला होता. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचरा विनाप्रक्रिया बावड्यातील अनेक शेतांमध्ये टाकल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पंचनामा करून त्यात ही बाब स्पष्ट केली होती.

    तसेच महानगरपालिकेच्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीतही हा गैरप्रकार सिद्ध झाला होता. परंतु, सहा महिने उलटून गेल्यानंतरही या घोटाळ्यातील दोषी असलेला कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर अत्यंत जुजबी कारवाई करून प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत भाजपने आज निदर्शने केली.

    ‘कचरा खाणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘कचरा शेठचं करायचं काय खाली डोकं वर पाय’, ‘महापालिका प्रशासन हाय-हाय’ अशा घोषणांनी महापालिका परिसर दुमदुमून गेला.