राज्यपालांच्या वक्तव्यावर अखेर भाजपचा आक्षेप; समर्थन करत नाही- बावनकुळे

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी आपण राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, अशी भूमिका स्पष्ट केली.

    मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर (Controversial Statement) अखेर भाजप (BJP) नेत्यांनी आक्षेप (Objection) घेतला आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपण राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, अशी भूमिका स्पष्ट केली.

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत जे काही वादग्रस्त वक्तव्य केले आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. आम्ही राज्यपालांची पाठराखण करत नाही. मात्र, शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न राज्यपालांनी केला असेल असे वाटत नाही. तरीही राज्यपालांच्या वक्तव्यामुळे शिवाजी महाराजांची प्रतिमा मलीन होत असेल तर भाजप अशा वक्तव्याचे समर्थन करणार नाही. भाजप छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच काम करत आहे.

    आशिष शेलार यांनीही राज्यपालांच्या वक्तव्यावर असहमती दर्शवली. आशिष शेलार म्हणाले, राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत जे काही वक्तव्य केले, त्याच्याशी आम्ही पूर्ण असहमत आहोत. राज्यपालांचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे, असे सांगितले.