‘भाजपमधून कोणी गेल्याने फरक पडत नाही’; उन्मेश पाटील यांच्या पक्षप्रवेशावर गिरीश महाजनांची टीका

उन्मेश पाटील यांच्या ठाकरे गट पक्षप्रवेशावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    जळगाव – जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणूकीचे तिकीट नाकारल्यामुळे नाराज उन्मेश पाटील यांनी शिवबंधन बांधत ठाकरे गटाचा झेंडा हाती घेतला. निवडणूकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. उन्मेश पाटील यांच्या ठाकरे गट पक्षप्रवेशावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष, इथे कोणी राहिल्याने गेल्याने कोणाला काही फरक पडत नाही’ असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

    त्यांनी जाण्याची घाई केली

    भाजप विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन यांनी टीका केली. महाजन म्हणाले, उन्मेष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेले असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांचा तिकिटाचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचा होता. मात्र ते भाजपमध्ये आल्यावर त्यांना आमदारकी खासदारकी आम्ही दिली त्यांनी जाण्याची घाई केली. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष इथे राहिल्याने गेल्याने कोणाला काही फरक पडत नाही. घोडा मैदान समोर आहे असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले.

    आम्हाला चांडाळ चौकडी म्हणत असेल तर

    पुढे गिरीश महाजन म्हणाले, “उन्मेष पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हटले होते देवेंद्र फडणवीस यांना चांडाळ चौकडीने घेरले आहे. पाटील यांनी पक्ष सोडला असल्यामुळे ते आता काहीही टीका करू शकतात. उन्मेष पाटील यांचं तिकीट नाकारण्याची कारणे केंद्रीय नेतृत्वाला माहिती आहेत. मी त्यांना वेळोवेळी सांगितले होते. मी त्यांना समज दिली होती. त्यांच्याशी चर्चा देखील केली होती. ते जर आम्हाला चांडाळ चौकडी म्हणत असेल तर त्यांनी आपलं काय चुकलं म्हणून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आमचा पक्ष असाच उभा राहिला नाहीये. हे त्यांच्यामुळे नाहीये. त्यांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही. उन्मेष पाटील यांनी तिकडे जाऊन फार मोठी चूक केली आहे आमच्याकडे त्यांना भविष्य होतं. त्यांना नंतर कळेल की आपण काही चूक केली.” असा घणाघात देखील गिरीश महाजन यांनी केला.

    “उद्धव ठाकरे यांनी आपली स्वतः ची कबर स्वतः खोदली असून आमच्याशी गदारी केली. तुम्ही अल्पशा सुखासाठी तुम्ही दुःखात गेला आहात, तुम्ही तुमची कबर स्वतःच खोदली आहे. तुम्ही लढा आणि जिंकून दाखवा. जनता ही आता कोण खरं आणि कोण खोट आहे म्हणून दाखवेल,” असा इशारा भाजप नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे.