भाजपने एमआयएमसह वंचितला १ हजार कोटी दिले: चंद्रकांत खैरे यांचा गौप्यस्फोट

भाजपने लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला १ हजार कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. आणि पक्षांना वाटप करण्यासाठी हा पैसा भाजपकडे आला कुठून असा सवाल देखील खैरे यांनी उपस्थित केला.

    औरंगाबाद : भाजपने लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला १ हजार कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. आणि पक्षांना वाटप करण्यासाठी हा पैसा भाजपकडे आला कुठून असा सवाल देखील खैरे यांनी उपस्थित केला. आज खैरे शिवसेनेच्या बैठकीनिमित्त जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीवर टीका केली.

    चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले? 

    एमआयएम, वंचित बहूजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राणा दाम्पत्य या भाजपच्या एबीसीडी टीम असल्याची टीका खैरे यांनी केली. राणा दाम्पत्याने चप्पल घालून हनुमान चालीसा म्हटली म्हणून हनुमानाने त्यांना १४ दिवस जेलमध्ये पाठवून दिले, असंही खैरे म्हणाले.

    तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपने धोका दिला असून युतीचे नेते असताना रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीत दवाखान्यात बसून मला धोका दिला. त्यामुळेच इम्तियाज जलील लोकसभेला औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडून आले, असा आरोप देखील खैरे यांनी दानवे यांच्यासह भाजप नेत्यांवर केला.