भाजप सरकार शेतकरी विरोधी, त्यांनी शेतकरी हिताचा कोणताही निर्णय घेतला नाही; शरद पवार यांची टीका

काहीजण मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बारामतीमध्ये मतं मागतात. बारामती लोकसभेच्या निवडणुकीत मोदी किंवा राहुल गांधी मतं मागण्यासाठी येणार नाहीत, ही निवडणूक स्थानिक जनशक्तीच्या मताच्या जोरावर देश पातळीवर योग्य काम कसं होईल, हे बघणाऱ्यांसाठीची ही निवडणूक आहे.

  बारामती / सुपे : काहीजण मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बारामतीमध्ये मतं मागतात. बारामती लोकसभेच्या निवडणुकीत मोदी किंवा राहुल गांधी मतं मागण्यासाठी येणार नाहीत, ही निवडणूक स्थानिक जनशक्तीच्या मताच्या जोरावर देश पातळीवर योग्य काम कसं होईल, हे बघणाऱ्यांसाठीची ही निवडणूक आहे. दुर्दैवाने समोरचा उमेदवार घरातील असून, घरातील उमेदवार उभा करण्याची आवश्यकता नव्हती, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलताना केली.

  शरद पवार यांनी सुपे, उंडवडी यासह जिरायती भागात दौरा केला. यावेळी सुपे येथे दुष्काळी भागातील जनतेशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पवार यांचे फटाक्यांची आतिषबाजी व फुलांची उधळण करत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी सदाशिव सातव, एस.एन.जगताप, युगेंद्र पवार, संभाजीराव झेंडे, माणिकराव झेंडे, बापूराव चांदगुडे, संपत काटे, बबनराव बोरकर, सुरेश भोसले उपस्थित होते.

  यावेळी पवार म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काहीजण मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मते मागत आहेत. मात्र, स्थानिक प्रश्नांबाबत ते काही बोलत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली, जे लोक या पक्षातून निवडून आले ते कोणी निवडून आणले, ज्यांना मंत्रिपदं दिली, ती कोणी दिली, हे सर्वांना माहित आहे. मी स्वतः करिता काही मागितलं नाही. नवीन कार्यकर्ते तयार करणे, त्यांना बळ देवून त्यांच्याकडून काम करून घेणे, हा आपला स्वभाव आहे.

  गेली दहा-वीस वर्षात स्थानिक राजकारणात आपण कधी लक्ष दिले नाही. पंचायत समिती, साखर कारखाना अथवा नगरपालिकेमध्ये कोणाला तिकीट द्या, हे आपण कधी सांगितलं नाही. फक्त योग्य माणसाची निवड करून चांगले सामूहिक काम करा, हा सल्ला आपण नेहमी दिला. मात्र, ज्यांच्यावर जबाबदारी दिली, त्यांनी टोकाची भूमिका घेऊन भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

  भाजप हा सर्वसामान्य जनतेच्या हिताची सोडवणूक करणारा पक्ष नसून मजबूत लोकांचा पक्ष आहे. अशा पक्षाबरोबर जाण्यासाठी लोकांनी मत दिली नव्हती, मागील विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी शंभर टक्के मतदान झालं, हे मतदान इथल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केलं. मात्र, आज आपण चुकीच्या रस्त्याने जातोय, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. चुकीच्या रस्त्याने जाण्याची भूमिका थांबवली पाहिजे, या निवडणुकीत योग्य रस्त्याने जाण्याची भूमिका जनतेने घ्यायला हवी, भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकरी हिताचा कोणताही निर्णय त्यांनी आजपर्यंत घेतला नाही. हुकूमशाहीच्या जोरावर दोन मुख्यमंत्र्यांना त्यांनी जेलमध्ये टाकले, असे शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.

  आमदार संजय जगताप म्हणाले, २६ जानेवारीपासून पुरंदर तालुक्यातील रिसे पिसे गावात टँकर सुरू आहे. सरकारकडे मागणी करूनही दुष्काळाबाबत ठोस उपाययोजना होत नाही. सरकार याबाबत गंभीर नाही.