आयुष्यात जे काही कराल ते ध्येयवेडे होऊन करा – भाजप गटनेते आ. दरेकरांचा विद्यार्थ्यांना सल्ला

आयुष्यात ज्या ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे. त्या गोष्टी आपण आत्मविश्वासाने केल्या पाहिजेत. त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. आपल्या आयुष्यातील हे वय खूप महत्वाचे आहे.

    मुंबई : आपले आई-वडील काबाडकष्ट करून आपल्याला शिक्षण देत आहेत. शिक्षकवर्ग मेहनत घेऊन आपल्याला शिक्षण देत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात जे काही करायचे आहे ते ध्येयवेडे होऊन करा, असा मोलाचा सल्ला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमावेळी दरेकर बोलत होते.

    यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, खरं म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन म्हटले तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा दिवस असतो आणि पालकांसाठी कुतूहल असते. मी या ठिकाणी दोन कार्यक्रम पाहिले, एक स्वागत गीत आणि दुसरा पांडुरंगाचा जयघोष करतानाचा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम पाहिला. अत्यंत आत्मविश्वासाने ही मुलं परफॉर्मन्स करताना दिसली. मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना एवढेच सांगेन आपण आयुष्यात जे काही कराल ते ध्येयवेडे होऊन केले पाहिजे. कारण आपले आई-वडील काबाडकष्ट घेऊन तुम्हाला शिक्षण देत आहेत. येथील शिक्षकवर्ग मेहनतीने शिकवण्याचे काम करताहेत, जी विश्वस्त मंडळी आहेत ती संस्था चालवत आपल्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मनापासून शिक्षण घ्यायला हवे, असेही दरेकर म्हणाले.

    ते पुढे म्हणाले की, आयुष्यात ज्या ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे. त्या गोष्टी आपण आत्मविश्वासाने केल्या पाहिजेत. त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. आपल्या आयुष्यातील हे वय खूप महत्वाचे आहे. शालेय शिक्षण हे आपल्या उद्याच्या जीवनाचा मार्ग दाखवत असते. शिक्षण जर मनापासून घेतले नाही, एक सोपस्कार म्हणून करणार असाल तर तुम्ही आयुष्यात मोठी झेप घेऊ शकणार नाही. त्यामुळे मला जे काही करायचे आहे ते सर्वोत्तम करायचे आहे. मी ज्या क्षेत्रात जाईन तिथे माझे नाव करेन, माझ्या संस्थेचे, माझ्या आई-वडिलांचे नाव करेन अशा प्रकारच्या जिद्धीने माझ्या बालमित्रांनी मेहनत घेऊन अभ्यास केला पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात चांगल्या प्रकारचे यश मिळावे आणि पालकांचे ऋण आपण चांगल्या प्रकारे फेडाल, अशी अपेक्षाही दरेकरांनी व्यक्त केली.

    दरेकर पुढे म्हणाले की, अभिनव शिक्षण संस्थेसाठी खुले नाट्यगृह उभे करतोय याचा फायदा आपल्या परिसरातील सर्व लोकांना होईल. अभिनव संस्थेसाठी जीजी मदत लागेल ती सांगा तुमच्या मागे ताकदीने उभा असेन असा विश्वासही दरेकर यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

    या प्रसंगी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश हळदणकर, कार्याध्यक्ष जगदीश वालावलकर, सचिव अमित ठाकूर, कोषध्यक्ष शैलेश मोरे, राजू वायंगणकर, बाळा सुर्वे, शिरीष वराडकर आदी उपस्थित होते.