देशातील ७० टक्के राज्यात भाजपची सत्ता नाही : शरद पवार

भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटीलसह १०० जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    बारामती:  भारताचा नकाशा बघितला तर केरळ पासून सुरुवात केल्यानंतर ७० टक्के भागामध्ये भाजपची सत्ता नाही, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये देशात नक्की परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलताना दिले.

    सोलापूर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष, व माळशिरस तालुक्यातील भाजपचे नेते रवींद्र पाटील यांनी त्यांच्या १०० समर्थकांसह शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

    यावेळी शरद पवार म्हणाले, सध्या देशाचा नकाशा बघितला तर खालून सुरुवात केल्यानंतर सुरुवातीचे केरळ राज्य,त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक यासह जवळपास ७० टक्के ठिकाणी भाजपची सत्ता नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये देशातील चित्र पूर्ण बदलून नक्की परिवर्तन होणार आहे. या देशाची लोकशाही आम्हा नेत्यांमुळे टिकली नसून सामान्य माणसामुळे टिकली आहे. परिवर्तन करण्याची ताकद या सामान्य माणसाच्या हातात आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपण फिरत असताना शेतकरी, कष्टकरी ही सामान्य जनता आपणास भेटून पाठिंबा व्यक्त करत आहेत. त्यामुळे या सामान्य माणसांच्या जोरावर परिवर्तन अटळ आहे. सोलापूर जिल्हा हा सुरुवातीपासून काँग्रेस विचाराचा आहे, या जिल्ह्यातून पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवलेंना दोन वेळा उमेदवारी दिल्यानंतर दोन्ही वेळा ते निवडून आले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या जिल्ह्याने राष्ट्रवादीला साथ दिली. नंतरच्या काळात चित्र बदलले. ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो, त्यामुळे या जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला. सध्या सोलापूर दौऱ्यावर असताना सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या भेटी घेत असताना त्यांनी स्वतःहून आम्ही आपल्याबरोबर असल्याचे अभिवचन दिले. रवींद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. कधी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना ताकद दिली जाईल. रवींद्र पाटील यांनी माझ्या आजोबापासून आम्ही शरद पवार यांच्याबरोबर होतो. अलीकडच्या काळात भाजपची विचारधारा स्वीकारली, मात्र भाजपने दलित- सुवर्ण असा वाद निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, हे आमच्या लक्षात आल्यानंतर पुरोगामी विचार असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा निर्णय आम्ही घेतला असून येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यामध्ये चित्र वेगळे पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. बळीराम साठे यांनी पाटील व त्यांच्या समर्थकांचे स्वागत करून त्यांना ताकद दिली जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान या प्रवेश कार्यक्रमानंतर पुरंदर तालुक्यातील शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन आम्ही कायम तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.