‘आत्मनिर्भर, विकसित भारतासाठी भाजप हाच पर्याय’; योगी आदित्यनाथ यांचं विधान

काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातील हिंदूंमध्ये जाती, धर्म, आरक्षण यामध्ये अडकवून फूट पाडायची आहे. ही फूट पाडून त्यांना ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाचा लाभ मुस्लिमांना द्यायचा आहे, असा दावा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.

  सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातील हिंदूंमध्ये जाती, धर्म, आरक्षण यामध्ये अडकवून फूट पाडायची आहे. ही फूट पाडून त्यांना ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाचा लाभ मुस्लिमांना द्यायचा आहे, असा दावा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.

  येथील चिंतामणी वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारात भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला ते संबोधित करीत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुरेश खाडे यांच्यासह इतर अनेकजण उपस्थित होते.

  गोहत्या करण्याचे पाप काँग्रेस करणार

  योगी आदित्यनाथ म्हणाले, “काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अल्पसंख्याकांना त्यांच्या इच्छेनुसार आहार घेण्याचे स्वातंत्र्य देणार, अशी काय वेगळं खाण्याची मुस्लिमांची इच्छा आहे, जी काँग्रेस पूर्ण करीत आहे, तर त्यांना गोमांस खाण्याची परवानगी याद्वारे दिली जणार आहे. गोहत्या करण्याचे पाप काँग्रेस करणार,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

  काँग्रेसचा अंतिम उपाय हिंदूत फूट

  योगी म्हणाले, “काँग्रेस लवकरच इतिहासजमा होणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये हे निवडणूक लढण्याचे सुद्धा धाडस करत नाहीत. मात्र, आता ते अंतिम उपाय म्हणून हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. जातीय जनगणनेच्या नावाखाली तुमची दिशाभूल करतील, ६५ वर्षे तुम्ही काय केलं?,
  हे विचारायला हवं”, असेही त्यांनी सांगितले.