“शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ ही जगातील मोठी फसवणूक”; ‘त्या’ सात घटनांचा उल्लेख करत बावनकुळेंचे टीकास्त्र

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या शपथनामा वरुन भाजप आक्रमक झाले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोस्ट शेअर करत टीका केली आहे.

    मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूकीच्या पूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना शरद पवार गटाकडून त्याला ‘शपथनामा’ म्हणण्यात आले आहे. यावरुन आता विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपने देखील या शपथनामा शब्दांवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शरद पवारांशी संबंधीत सात घटनांचा उल्लेख केला आहे.

    “शपथनामा” ही जगातील मोठी फसवणूक

    चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की,  “शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. 26 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली. आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे.”  अशा शब्दांत बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

    त्या सात घटना कोणत्या? 

    पुढे बावनकुळे यांनी शरद पवार यांच्याशी संबंधित सात घटनांचा उल्लेख केला आहे. 1977 मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. 1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले. 1980 मध्ये 40 आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1988 मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 1999 मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली. 2019 मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला! 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?” असा सवाल उपस्थित करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.