उद्धव ठाकरे हे मतांच्या राजकारणासाठी लाचार झाले आहे; चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

    अहमदनगर : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. प्रचार सभा आणि बैठका यांचे देखील सत्र वाढले आहे. आत्तापर्यंत मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदान हे लवकरच पार पडणार आहे. त्यापूर्वी राजकारणी एकमेकांवर जहरी टीका करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

    काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला होता. करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या पिस्तुलमधील नव्हती असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर राज्यातील राजकारण जोरदार रंगले. यान विधानानंतर भाजपने कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा यावरुन ठाकरे गट यांना सवाल केला असून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

    भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर संशय घेतलेला उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? शहीद हेमंत करकरे यांचा केलेला अपमान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का ? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी काँगेसच्या विचारसरणीशी सहमत झाले आहे. त्यामुळे ठाकरे हे राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व अपेक्षा संपलेली आहे. उद्धव ठाकरे हे मतांच्या राजकारणासाठी लाचार झाले आहेत,” असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगर शहरात उद्धव ठाकरेंवर केला आहे.