भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना केंद्राची X दर्जाची सुरक्षा

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना केंद्रानं झेड दर्जाची सुरक्षा दिलेली असतानाच, आता भाजपचे आणखी एक नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना केंद्रानं एक्स दर्जाची सुरक्षा दिली आहे. 

  मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना केंद्रानं झेड दर्जाची सुरक्षा दिलेली असतानाच, आता भाजपचे आणखी एक नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना केंद्रानं एक्स दर्जाची सुरक्षा दिली आहे.

  पडळकर यांना आता सीआयएसएफची एक्स दर्जाची सुरक्षा असेल. सोलापुरात पडळकर यांच्यावर हल्ला झाला होता. त्यामुळं पडळकरांना केंद्राकडून एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

  दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर काही महिन्यांपूर्वी सोलापूरमध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या घटनेनंतर पडळकर यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत होती.

  माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश भाजपनंही पडळकरांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी वारंवार राज्य सरकारकडे केली होती. मात्र, राज्य सरकारकडून पडळकरांना सुरक्षा देण्यात आली नाही. अखेर केंद्रानं पडळकर यांना सीआयएसएफची एक्स दर्जाची सुरक्षा दिली आहे.

  एक्स दर्जाची सुरक्षा कशी असते? 

  एक्स दर्जाची सुरक्षा हा सुरक्षा श्रेणीचा चौथा स्तर आहे. या श्रेणीत दोन सुरक्षा रक्षक तैनात असतात. ज्यामध्ये एक पीएसओ (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर) असतो. देशातील अनेकांना एक्स-क्लास सुरक्षा आहे. या सुरक्षेमध्ये कोणतेही कमांडो सहभागी नसतात. बऱ्याच लोकांना या दर्जाची सुरक्षा मिळते.