किरीट सोमय्या यांचे रोहित पवारांवर आरोपसत्र सुरुच; ट्वीट करत ईडीकडे कारवाईची मागणी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत रोहित पवार यांच्यावर आणखी काही आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. ईडीच्या या छापेमारीनंतर सोमय्या यांचे ट्वीट चर्चेत आले आहे.

    मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अ‍ॅग्रो (Baramati Agro) कंपनीशी निगडीत ठिकाणांवर ईडीने (ED) छापेमारी केली आहे. पुणे, बारामती अशा एकूण ६ ठिकाणी ईडीकडून छापे मारण्यात आले आहेत. रोहित पवार हे बारामती अॅग्रो कंपनीचे सीएओ आहेत. ईडीने मनी लॉन्ड्रींग (Money laundering) प्रकरणामध्ये चौकशी सुरु केल्याने रोहित पवारांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट करत रोहित पवार यांच्यावर आणखी काही आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. ईडीच्या या छापेमारीनंतर सोमय्या यांचे ट्वीट चर्चेत आले आहे.

    2021 साली केले होते ट्वीट

    भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2021 साली ट्वीट करत बारामती अ‍ॅग्रो बाबत चौकशी करण्याची मागणी केली होती.  यावेळी त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते, ‘बारामती अ‍ॅग्रो कंपनीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या लिलावात फेरफार करुन कन्नड सहकारी साखर कारखाना अवघ्या 50 कोटी रुपयात खरेदी केला’ असा आरोप करत या प्रकरणाची ईडीने चौकशी करावी अशी मागणी केली होती.

    नवीन ट्वीटमध्ये सखोल तपासणीची मागणी

    किरीट सोमय्या यांनी नव्या ट्वीटमध्ये पुन्हा एकदा जुने ट्वीट शेअर करत कारवाईची मागणी केली आहे. सोमय्या यांनी लिहिले आहे, “मी पुन्हा एकदा तपास यंत्रणांना रोहित पवार यांच्याविरोधात सखोल तपास करण्याची विनंती करतो. कोट्यवधी रुपयांचा कन्नड सहकारी साखर कारखाना बारामती अ‍ॅग्रोने अवघ्या 50 कोटी रुपयांत विकत घेतला होता”, असे किरीट सोमय्या यांनी आपल्या नव्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई चालू असल्यामुळे सोमय्या यांचे हे ट्वीट चर्चेमध्ये आले असून यामुळे रोहित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.