‘जरांगे पाटील यांची भाषा, ती शरद पवारांची स्क्रिप्ट’; राम कदम यांचा घणाघात

अनेक आरोप करत राम कदम यांनी रोहित पवार व शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील यांच्या मुखातून जी भाषा येते ती शरद पवारांची स्क्रिप्ट आहे असा गंभीर आरोप राम कदम यांनी केला आहे.

    मुंबई : भाजप नेते राम कदम यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला धारेवर धरले आहे. अनेक आरोप करत राम कदम यांनी रोहित पवार व शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील यांच्या मुखातून जी भाषा येते ती शरद पवारांची स्क्रिप्ट आहे असा गंभीर आरोप राम कदम यांनी केला आहे.

    शरद पवार गटावर निशाणा साधताना राम कदम म्हणाले, “सेना नेते अशोक पनवेलकर यांनी सांताक्रुज पोलीस स्टेशनला एक तक्रार नोंदवली, अनेक वायरल व्हिडिओ त्यांनी समोर आणले आहेत. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत असभ्य शब्द वापरण्यात आले आहेत अनेक वादग्रस्त विधान करत मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कुठेतरी त्या व्हिडिओ मधून समोर आला आहे कोण आहे व्हिडिओ व्हायरल करणारा? तर शरद पवार गटातील नेता, जो बारामती मध्ये राहतो त्याला सोडून द्या म्हणून आमदार रोहित पवारांचा फोन गेला  काय संबंध रोहित पवारांचा?” असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

    तसेच राम कदम पुढे म्हणाले, “एका ठिकाणी मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले. त्यात मराठ्यांच्या आंदोलनामध्ये एक दगडफेक झाली, तर दगडफेक करणारा कोण?, दगडफेक करणारा हा देखील शरद पवार गटातील एक आमदार आहे, हे खरं आहे का? रोहित पवारांची इच्छा आहे का जाती-जातीमध्ये भांडण लावण्याची आहेत का?  एका ठिकाणी तुम्ही मराठ्यांना बदनाम करावे, दुसरीकडे असे व्हिडिओ करून जाती-जातीत भांडण लावायची. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत पहिल्यापासून आहोत. पण मराठा समाजाला बदनाम करण्याचा घाट यांनी घातला आहे.  जरांगे पाटील यांच्या मुखातून जी भाषा येते ती शरद पवारांची स्क्रिप्ट आहे,” असा घणाघात राम कदम यांनी केला आहे.