फडणवीसांवरच्या गंभीर आरोपानंतर भाजप नेते आक्रमक; जरांगे पाटलांना सुनावले खडेबोल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मनोज जरांगे पाटील यांना खडेबोल सुनावले.

    मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. ‘फडणवीस मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी ते कट रचत आहेत. सलाईनमध्ये विष देऊन मला मारण्याचा विचार चालू आहे. माझे एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे.’ असे आरोप जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले आहेत. यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मनोज जरांगे पाटील यांना खडेबोल सुनावले.

    भाजपचे विधानपरिषदचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. आरक्षण दिल्याने समाज आता खूश आहे, जरांगे तुमच्या सल्ल्याची आता समाजाला गरज नाहीये असे देखील प्रसाद लाड म्हणाले. जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आमदार लाड म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची नोंटकी आता बंद करावी. समाजाच्या नावाखाली स्वतःचा राजकीय वरदहस्त करण्याचा प्रयत्न जरांगे करत होते. त्याचा मागचा बोलविता धनी कोण हे त्यांनी सांगावे. सिल्वर ओक आहे की जालन्यातील भैय्या फॅमिली आहे. ज्या फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत, त्या फडणवीसांचे सारखं नाव घ्यायला तुम्हाला कोण लावतंय, ते जनतेसमोर आलंय. आजच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येतीये.” अशा शब्दांमध्ये आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

    त्याचबरोबर भाजप नेते व माजी आमदार आशिष देशमुख यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपामुळे हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना आशिष देशमुख म्हणाले, “स्वतःच्या हातातून मराठा आंदोलन सुटत चालल आहे, याची जाणीव झाल्याने जरांगे पाटील असे आरोप करत आहेत. महाराष्ट्राला उन्नतीवर नेण्याचं काम आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याच काम देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे. त्यामुळे जरांगेनी सबुरीने घेऊन आपला बालहट्ट सोडावा,” अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष देशमुख यांनी दिली आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीवे मारण्यासह अनेक गंभीर आरोप केल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे.