भाजप नेत्याच्या पुतण्याचा अपघातामध्ये मृत्यू,  सीटबेल्ट लावल्याने वाचवले मित्राचे प्राण; बीड जिल्ह्यात हळहळ

माजलगाव येथील छत्रपती नागरिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप व त्यांचा मित्र आर्यन कंटुले हे काही कामानिमित्त औरंगाबाद येथे गेले होते. काम आटपून गावी माजलगावच्या दिशेने परत येत असताना गेवराई जवळ बायपास रोडवर रात्री बाराच्या दरम्यान त्यांच्या चार चाकी वाहनावरील विश्वजीत यांचा ताबा सुटला.

    बीड- बीडमध्ये भाजप नेत्याच्या एका नातेवाईकाचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास गेवराई बायपास जवळ अपघात झाला होता. यामध्ये विश्वजीत जगताप यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातावेळी विश्वजीत यांचा मित्रही गाडीत होता. परंतु, केवळ सीटबेल्ट लावल्याने त्याला किरकोळ दुखापतीपलीकडे कोणतीही इजा झाली नाही.

    माजलगाव येथील छत्रपती नागरिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप व त्यांचा मित्र आर्यन कंटुले हे काही कामानिमित्त औरंगाबाद येथे गेले होते. काम आटपून गावी माजलगावच्या दिशेने परत येत असताना गेवराई जवळ बायपास रोडवर रात्री बाराच्या दरम्यान त्यांच्या चार चाकी वाहनावरील विश्वजीत यांचा ताबा सुटला. त्यामुळे त्यांची कार टेम्पोवर जाऊन धडकली.या दुर्घटनेत विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासह असलेल्या मित्र आर्यन कंटुले याने सीट बेल्ट लावलेला असल्याने त्याला सुदैवाने किरकोळ मार लागला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान घडली. विश्वजीत जगताप यांच्या पक्षात आई-वडील दोन बहिणी असा परिवार आहे मात्र या अपघातामुळे राजकीय क्षेत्रासह बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.