girish bapat

खासदार गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात आलं आहे.

पुणे: माजी मंत्री आणि सध्याचे पुण्याचे (Pune) भाजपचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बापट यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता.


पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये गिरिश बापट यांच्यावर सध्या आय.सी.यु मध्ये उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आहे. गिरीश बापट हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, बापट यांच्या प्रकतीबाबतचे पुढील अपडेट दुपारी देण्यात येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी गुढीपाडव्यानिमित्त कसबा गणपतीसमोर गिरीश बापटांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला गिरीश बापट यांच्याकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आणि त्यांचे भाजपमधील प्रतिद्वंद्वी हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा सर्वसमावेशकपणा हेच गिरीश बापट यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते. गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ झालं बापट हे राजकारणात सक्रीय आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

प्रतिष्ठेच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात खासदार गिरीश बापट सक्रिय झाले होते. खासदार बापट यांच्या उपस्थितीत कसब्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा केसरी वाड्यात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच गिरीश बापट जाहीरपणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि गिरीश बापट दोघेही भावूक झाले होते.