
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा विरोध करत ताफ्यातील दोन गाड्या फोडल्या. कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात ही घटना घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नांदेड : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. गावोगावी राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केली जातं आहे. या बाबत गावबंदीचे बॅनर देखील लावले जातं आहेत. त्यातचं गुरुवारी रात्री भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. गावात प्रवेश केल्याने आंदोलकांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा विरोध करत ताफ्यातील दोन गाड्या फोडल्या. कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात ही घटना घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेवर प्रतापराव चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबुलगा गावात माझा कोणताही राजकीय कार्यक्रम किंवा बैठक नव्हती. मित्र आजारी असल्याने मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. मात्र, गावात प्रवेश करताच अचानक मराठा तरुण आले. मी गावात का आलो याचं कारण न विचारताच या तरुणांनी ताफ्यातील वाहनांवर दगडफेक केली, असं प्रतापराव चिखलीकर यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे, पण असा उद्रेक योग्य नाही, अशी खंत देखील चिखलीकर यांनी बोलताना व्यक्त केली.
पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले, अनेक ठिकाणी मराठा समाजाने राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं देखील मी समर्थन करतो. पण कुणी आजारी असल्यास त्यांची विचारपूस करण्यासाठी देखील गावात जायचं नाही का? कोणाच्या अंत्यविधीला जायचं नाही का? असा सवालही चिखलीकर यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाने सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमावर बिनधास्त बंदी घालावी, पण नातेवाईकांना भेटने अंत्यविधीला जाण्यास राजकीय नेत्यांना बंदी घालू नये. या गोष्टींचा मराठा तरुणांनी तसेच आंदोलकांनी विचार करावा, अशी विनंती देखील चिखलीकर यांनी केली. माझ्या ताफ्यातील वाहने फोडल्यानंतर माझ्या मनात मराठा समाजाबद्दल कुठलाही राग नाही, असं देखील चिखलीकर यांनी स्पष्ट केलं.