त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट आहे, भाजप आमदार गणपत गायकवाड यांची मंंत्र्यांसमोरच शिवसेनेवर सडेतोड टिका

शिवसेनेच्या लोकांनी आरक्षीत भूखंडावर बेकायदा बांधकामे केली आहेत.

    कल्याण : आत्ता तर धनुष्यबाणापेक्षा रॉकेट पण चालतात. त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट आहे. मला छेडण्याचा प्रयत्न केला तर मी नाव घेऊन सांगेन. मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही. माझ्या निधीच्या फाईल्स कोणाच्या टेबलखाली दाबून ठेवल्या आहेत. इतकेच नाही तर सर्व सण येत आहे. पोलिसांवर ताण आहे. पोलिसांची मदत ही जनतेला मिळाली पाहिजे. मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गुंडांना चार चार पोलिसांचा बंदोबस्त दिला जातो अशी टिका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित केली आहे. कल्याणमध्ये भाजप कार्यकारी नियुक्ती समारंभात गायकवाड यांनी पुन्हा शिवसेनेच्या शिंदे गटाला टिकेचे लक्ष्य केले आहे.

    कल्याण पूर्वेत भाजप कार्यकारी नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, भाजप आमदार गणपत गायकवाड, भाजपचे प्रदेश पदाधिकारी नरेंद्र पवार, गुलाबराव करंजुले, प्रदेश सचिव माधवी नाईक, शशिकांत कांबळे, रेखा चौधरी, कल्याण पश्चिम शहराध्यक्ष वरुण पाटील कल्याण पूर्व शहराध्यक्ष संजय मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान भाजप माजी नगरसेवक मनोज राय यांना उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. मनोज राय यांच्यासह अनेकांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सर्व वक्त्याचे एक मत होते की, या वेळी भाजपचा महापौर कल्याण डोंबिवली महापालिकेत बसवायचा आहे.

    त्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्ते अंग झाडून कामाला लागले पाहिजे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले. यावेळी महापौर भाजपचा होणार, फक्त कोण होणार हे ठरवायचे आहे. मागच्या वेळी शिवसेना भाजपमध्ये महापौर पदावरुन घडलेल्या राजकीय घडामोडींची आठवण करून देत भाजपचा महापौर बसणार आहे. शेवटच्या क्षणी गडबड झाली. ही गडबड मातोश्री वरुन झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महापौर भाजपचा व्हायला पाहिजे. एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे आहेत, त्यामुळे आपल्याला संधी आहे. आत्ता फक्त महापौर कोण बसावयाचा हाच विषय आहे.

    यावेळी आमदार गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले कशाप्रकारे त्यांच्या फाईल्स दाबून ठेवल्या आहेत. कल्याण पूर्वेकरीता १२९ कोटी रुपयांचा निधी मी मंजूर करुन आणला आहे. तो निधी आत्ता दसऱ्याच्या नावाने वापरला जात आहे. शिवसेनेच्या लोकांनी आरक्षीत भूखंडावर बेकायदा बांधकामे केली आहेत. ती अनधिकृत बांधकामे हटवा गणशोत्सव, दिवाळी सण होणार आहेत. त्याच्या बंदोबस्ताकरीता पोलिसांवर मोठा ताण आहे. पोलिसांची मदत नागरीकांना झाली पाहिजे. शिवसेनेच्या पदाधिकारी गुंडांना चार चार पोलीस दिले जात आहेत. यासंदर्भात मी पोलिसांना पत्र दिेले आहे.