
पुणे : बारामती लाेकसभा मतदारसंघ जागा वाटपात काेणाच्या वाट्याला येईल हे आता सांगता येणार नाही. ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसला जरी गेली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजप ताकद लावेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत व्यक्त केले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्याविराेधात निवडणूक
धायरी येथे भाजपच्या वतीने आयाेजित ‘घर चलो अभियाना’त सहभागी हाेण्यासाठी बावनकुळे आले हाेते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविराेधात निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकणे हा महत्त्वाचा भाग आहे, उमेदवार काेण हे महत्त्वाचे नाही, महायुतीच्या जागा वाटपात ही जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला मिळाली तरी त्यांच्या उमेदवाराला विजयी केले जाईल.’’
बारामती जिंकण्याचा निर्धार
‘‘बारामतीत उमेदवार काेण असेल याला महत्व नाही. महायुतीची मते त्या उमेदवाराला मिळतील. बारामती जिंकण्याचा निर्धार असून कार्ययकर्ते सहाशे घरांना भेटी देतील, असेही त्यांनी नमूद केले.