अमरावतीच्या जागेवर भाजपचा दावा; पण रवी राणा यांच्या ‘त्या’ चिठ्ठीची राजकीय वर्तुळात चर्चा

अमरावती लोकसभेच्या उमेदवारीला घेऊन भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. महायुतीमध्ये ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.

    अमरावती : अमरावती लोकसभेच्या उमेदवारीला घेऊन भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. महायुतीमध्ये ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. दरम्यान आता फडणवीस यांनी त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत या जागेवर भाजपचाच दावा प्रबळ असल्याचे स्पष्ट केले आहे. अमरावतीची जागा भाजपच लढवणार असून, जो कोणी उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावरच लढेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    खासदार नवनीत राणा या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार का, या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नवनीत राणा संपूर्ण पाच वर्ष भाजपसोबत राहिल्यात. त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकतीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडली आहे. पण, असे असले तरी उमेदवारी संदर्भात अंतिम निर्णय आमचे पार्लमेंटरी बोर्ड किंवा इलेक्शन कमिटी घेते, असे त्यांनी सांगितले.

    दरम्यान, तत्पूर्वी सकाळी अमरावती येथील बेलोरा विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार रवी राणा यांनी धावती भेट घेतली. पुष्प देऊन राणा यांनी फडणवीस यांचे स्वागतही केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक चिठ्ठी देखील दिली. त्यामध्ये काय होते, याबाबत दिवसभर वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. पण, या भेटीनंतर आमदार रवी राणा हे तातडीने मुंबईला रवाना झाले होते.