भाजपला जोरदार धक्का! विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश

भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.

    मुंबई – देशामध्ये सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. जागावाटप व पक्षाकडून तिकीटे दिली जात आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्य़े हा पक्षप्रवेश पार पडला असून मातोश्रीवरुन त्यांनी जनतेशी संवाद साधला आहे.

    उन्मेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने पाटील यांचे तिकीट कापून भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज उन्मेश पाटील यांनी काल (दि.02) मातोश्रीवर भेट घेतली होती. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उन्मेश पाटील यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. यानंतर आता उन्मेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधत ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.

    माझ्या कामाची किंमत नाही केली – उन्मेश पाटील

    पक्षप्रवेशावेळी भावना व्यक्त करताना उन्मेश पाटील म्हणाले माझी लढाई आत्मसन्मानाची आहे. मी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झाल्याने बाहेर पडलो नाही. माझ्या कामाची आणि विकासाची किंमत नाही. मी प्रामाणिकपणे मतदार आणि सरकारमध्ये दुवा म्हणून काम केलं. मात्र दुर्दैवाने बदला घेण्याचं राजकारण रोज मनाला वेदना देणारं होतं. मला रिव्हेन्ज पॉलिटिक्स नकोय तर आम्हाला चेंज पॉलिटिक्स हवं आहे. मी कार्यकर्त्य़ांच्या वेदना लक्षात घेऊन आवाज उठवला. मी आत्मसन्मासाठी लढतोय तिकीटासाठी नाही. मला मान, पद नकोय पण कार्यकर्त्यांची ज्या पद्धतीने अवहेलना करण्यात आली आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे. विकासाच्या ऐवजी विनाशाची आणि बदल ऐवजी बदला घेण्याची जी भावना रुजवली जात आहे ती राज्यासाठी घातक आहे, असे मत खासदार उन्मेश पाटील यांनी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केले.