पुण्याचे भाजपचे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित

पुणे शहर लाेकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी कोथरूड ते डेक्कन या दरम्यान रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

  पुणे : पुणे शहर लाेकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी कोथरूड ते डेक्कन या दरम्यान रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
  उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी शहरातील मान्यवर व्यक्ती, ज्येष्ठ नेते यांच्या गाठीभेटींसह विविध भागात पदयात्रा काढून प्रचाराची सुरूवात केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (गुरुवारी) मोहोळ यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केला. तत्पूर्वी मोहोळ यांनी ग्रामदैवत कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी यांचे दर्शन घेतले. तसेच कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सकाळी पावणे आकरा मोहोळ यांच्या रॅलीस सुरुवात झाली.
  रॅलीमधील महाविजय रथा मधून मोहोळ यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर आदी नेते उपस्थित हाेते.
  कोथरूड ते डेक्कन येथील खंडूजीबाबा चौक या दरम्यान काढण्यात आलेल्या या रॅलीचे जागोजागी भले मोठे पुष्पहार आणि जेसीबीमधून फुलांची उधळण अािण फटाके वाजवत स्वागत केले गेले. रॅलीमध्ये भाजप, मनसे, शिवसेना, रिपाइं, लहुजी सेनेचे झेंडे मोठ्या संख्येने फडकत होते. यामध्ये मनसे आणि रिपाइंच्या झेंड्यांची संख्या लक्षणीय होती. रॅलीमध्ये सहभागी झालेले महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे कार्यकर्ते मोदी व महायुतीच्या जयघोषासह ढोल-ताशा आणि हलगीच्या तालावर ठेका धरत होते.
  उशीर झाल्याने फडणवीसांनी सभा टाळली 
  सदर रॅलीची सांगता खंडाेजीबाबा चाैकात जाहीर सभेने हाेणार हाेती. परंतु, रॅली या चाैकात पाेचण्यास उशीर झाला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना जळगाव येथे जायचे असल्याने ते रॅली साेडून मोहोळ व इतर मंत्री व प्रमुख नेत्यांसह गाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.