मुंबईत भाजपच्या राजकीय हालचालींना वेग! मोदींच्या रोड शोपूर्वी बावनकुळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबईतील प्रचारामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. रोड शो पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

    मुंबई : मुंबईच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला रंगत येऊ लागली आहे. मुंबईमध्ये भाजपसह महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर देखील दिले जात आहे. आज मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो पार पडणार आहे. त्यापूर्वी भाजप व प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. मुंबईच्या राजकीय हालचालींना वेग आला असून भाजप मुंबईसाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहे. मुंबईतील प्रचारामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. रोड शो पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

    चंद्रशेखर बावनकुळे व राज ठाकरे यांची भेट

    लोकसभा निवडणूकीसाठी मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली. त्यानंतर आता येत्या 17 मे रोजी राज ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजी पार्कवर एकत्रित येणार असल्यामुळे सर्वांना उत्सुकता लागली आहे. मुंबईतील प्रचार व राजकारणामध्ये भाजप मनसेची युती महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

    शिवाजी पार्कवरील सभेकडे लक्ष

    बावनकुळे व राज ठाकरे यांच्यामध्ये लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. सभांचे निमंत्रण, हिंदूत्वाचा अजेंडा आणि मराठी मतांचा टक्का यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. राज ठाकरे यांच्यामुळे मुंबई आणि परिसरात मराठी टक्का खेचून आणण्याचा प्रयत्न महायुती करणार आहे. मनसे महायुतीच्या प्रचारामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह राज्यातील अनेक भागात मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारासाठी सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. तसेच राज ठाकरे यांच्या देखील सभा पार पडल्या आहेत. आता सर्वांचे दोन दिवसांवर आलेल्या शिवाजी पार्कवरील सभेकडे लक्ष लागले आहे.