‘भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे’, अमरावतीच्या हिंसाचारावरून पवार यांची आगपाखड

आदिवासी अशा शक्तींना कधीही बळी पडत नाही, असं पवारांनी सांगितलं. त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद का उमटले? असा सवाल त्यांनी केला. भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

    गडचिरोली (Gadchiroli) : त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद का उमटले? असा सवाल करतानाच भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर चढवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो शरद पवार गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील वडसा येथे भव्य शेतकरी शेतमजूर कार्यकर्ता मेळावा तथा पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी हा टोला लगावला.

    सध्या सांप्रदायिक विचार, जातीयवाद्यांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न होतोय. जातीवादी विचार माणसामाणासात द्वेष निर्माण करत आहे. हा विचार राबवणाऱ्या शक्तिंना खड्यासारखं बाजूला ठेवणं आपलं कर्तव्य आहे. आदिवासी अशा शक्तींना कधीही बळी पडत नाही, असं पवारांनी सांगितलं. त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद का उमटले? असा सवाल त्यांनी केला. भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

    अनिल देशमुख यांना कसे गोवण्यात आले?; नवाब मलिक यांनी सांगितला घटनाक्रम
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी संमेलनात वनवासी हा शब्द वापरला. त्यांच्या भाषणात आदिवासी हा शब्दच नव्हता. पण आदिवासी समाजाला वनवासी शब्द मान्य नाही, असा टोला त्यांनी मोदींना लगावला. आदिवासी हा जंगलाचं रक्षण करण्याचं काम करतोय. जल, जमीन, जंगलाचं रक्षण आदिवासी करत आहे. त्यामुळे आदिवासींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे, असं पवारांनी सांगितलं.

    नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी द्यावा. वेळप्रसंगी सरकारने कर्ज काढावं. पण शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिलासा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. संसदेच्या आगामी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू. जर संसदेत सत्ताधाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही, तर देशभर शेतकरी आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.