
पिंपरी / (अमोल येलमार) : ताथवडे येथे टँकरमधून अवैधरित्या गॅस काढून घेत असताना सिलिंडरचे एका पाठोपाठ मोठे स्फोट झाले. या स्फोटानंतर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी धक्कादायक वक्त्यव्य केली आणि अनेक अवैध धंद्यांचा विषय चव्हाट्यावर आला. पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण परिसरात स्टील, सिमेंट, फ़र्निस ऑइल, डिझेल, गॅस यांचा काळाबाजार सुरू असून वेगवेगळ्या परिसरात यासाठी ‘रॅकेट’ कार्यरत आहेत.
वेळेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला
ताथवडे येथील जीएसपीएम महाविद्यालयाच्या शेजारील मोकळ्या जागेत सुरू असणाऱ्या गॅसचा गोरख धंदा स्फोट झाल्याने समोर आला. कॅप्सूल टँकरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना ‘लिकेज’ होऊन एका पाठोपाठ एक असे नऊ स्फोट झाले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तर अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
पुण्यात ड्रग्स माफिया आणि पिंपरीत गॅस माफिया फोफावले
ताथवडे येथील गॅसच्या स्फोटानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पुण्यात ड्रग्स माफिया आणि पिंपरी चिंचवड शहरात गॅस माफिया फोफावत असून याला पोलिसांची हफ्तेखोरी कारणीभूत असल्याचे सांगत त्वरित संबंधित दोषींवर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर दोन अधिकारी आणि 4 पोलीस अंमलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
‘फर्निस ऑईल’चा काळाबाजार …
या स्फोटानंतर शहरात सुरु असलेल्या इतरही काळाबाजार चव्हाट्यावर आले आहेत. महामार्गावरून वेगवेगळ्या ऑईलचे टँकर धावत असतात. महामार्गालगत निर्जन ठिकाणी या टँकरमधून ऑइल काढून घेतले जाते. टँकरचालक देखील या रॅकेटमध्ये सहभागी असतात. चोरून काढलेल्या या ऑईलची शहरभर विक्री केली जाते. यामध्ये सर्वाधिक फर्निस ऑईलला काळाबाजार सुरु आहे.
मोठ्या प्रमाणात उद्योगिक कंपन्या
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात उद्योगिक कंपन्या आहेत. याठिकाणी फर्निस ऑइलची गरज भासते. तळेगाव, पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण एमआयडीसी या परिसरातील काही कंपन्या मधील अधिकारी, कर्मचारी, टँकर चालक आणि ऑईल माफिया हे काळाबाजार करत आहेत.
पेट्रोल /डिझेलची चोरी …
मुंबई- बंगळूर महामार्गावरून जाणाऱ्या पेट्रोल/डिझेल टँकर मधून चोरी करून स्वतः विक्री करणारे रॅकेट कार्यरत आहे. टँकरमधून पेट्रोल/डिझेल काढून ते मोठ्या बांधकाम साईट तसेच कंपन्या मध्ये असलेल्या जेसीबी आणि अवजड वाहन चालकांना कमी दरात विक्री केली जाते. दररोज रात्री हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु असतो.
बांधकाम क्षेत्र जोमात; स्टील, सिमेंट माफिया सुसाट….
पिंपरी चिंचवड शहरात सर्वच ठिकाणी बांधकाम साईट मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या ठिकाणी स्टील आणि सिमेंटची मोठी मागणी असते. याचाच फायदा घेत शहरात ‘स्टील, सिमेंट’ माफिया फोफावला आहे.
वाहनांमधून काही टन स्टील उतरवले
शहरात स्टील, सिमेंटच्या रॅकेट मध्ये मोठे धेंडे उतरले आहेत. मोठ्या बांधकाम साईटवर स्टील (लोखंडी सळई) घेऊन जाणाऱ्या वाहनांमधून काही टन स्टील उतरवले जाते. त्यानंतर वजनकाटा ‘मॅनेज’ करून वजनाची खोटी पावती घेतली जाते. बांधकामसाईटवर असलेल्या सुपरवायझरला पावती दाखवली जाते. सुपरवायझरने हरकत घेऊन पुन्हा वजन करण्याचा आग्रह केल्यास त्याला चिरीमिरी देऊन गप्प केले जाते. त्यानंतर चोरलेले स्टील अल्पदारात छोट्या व्यवसायिकांना विक्रीसाठी दिले जाते. यांचा थेट फटका मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना बसत आहे.
सिमेंटच्या पोत्यांमध्ये भेसळ
बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या पोत्यांमध्ये भेसळ केली जात आहे. भेसळ केलेले सिमेंट काही रक्कम कमीने विक्री करण्याचे उद्योगही सुरु आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आयुष्याची पुंजी लावलेल्या घराच्या कामाचा दर्जा खालवणार आहे.
गॅस रिफिलिंग सर्रास….
शहरात कामाच्या निमित्ताने अनेक ठिकाणाहून नागरिक येऊन राहत आहेत. या सर्वाना अपुऱ्या कागदपत्रांमुळे गॅस कनेक्शन मिळणे अवघड होते. याचाच फायदा काहीजण घेत आहेत. मोठ्या सिलेंडर मधून छोट्या सिलेंडर मध्ये गॅस रिफिलिंग करून विक्री सर्रासपणे सुरु आहे. यावर पोलिसांची अधून मधून छोटी मोठी कारवाई होत असते. मात्र तरीही पुन्हा त्याच जोमाने हा धंदा सुरु होतो.
आशिर्वादाशिवाय अशक्य सगळं …
ताथवडे गॅस स्फोट प्रकरण आणि तानाजी सावंत यांचा आरोपानुसार शहरात अवैध धंदे स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय चालूच शकत नाही. त्यामुळे शहरातील स्टील, सिमेंट, फर्निस ऑइल, गॅस हे काळाबाजार आशिर्वादाशिवाय चालणे अशक्यच आहे सगळं.
कडक कारवाईची आवश्यकता …
शहरात सुरु असलेल्या वेगवेगळ्या काळाबाजारावर स्थानिक पोलिसांनी केली पाहिजे. मात्र आयुक्तालयात असणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकांनी अश्या ‘रॅकेट’ची माहिती मिळवून पाळेमुळे नष्ट करत आरोपींच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.