Dhangar Samaj reservation

  बारामती/माळेगाव : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी गेले नऊ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ धनगर समाज आक्रमक झाला आहे.धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काटेवाडीसह अन्य भागामध्ये विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून धनगर समाजाला एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

  बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर धनगर समाजाच्या वतीने सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना धनगर समाज एसटीमध्ये समाविष्ट असून देखील एसटी आरक्षण मिळत नाही. धनगर ऐवजी धनगर असा शब्दभ्रंश झाल्याने धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळत नाही. शासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून तात्काळ एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली.

  यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, बारामती बाजार समितीचे संचालक शुभम ठोंबरे, कल्याणी वाघमोडे, ढेकळवाडीचे सरपंच सुभाष ठोंबरे, माजी सरपंच नानासाहेब घुले, शिवाजी घुले, दिलीप घुले, राहुल घुले, श्रीधर घुले, अविनाश भिसे, प्रकाश गरदडे, प्रकाश ठेंगल, युवराज काळे, आबा टकले आदीसह इतर कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांचा धनगर समाज आरक्षण प्रश्न समाचार घेतला. हे रास्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले. दरम्यान इतर विविध भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला. बारामती तालुक्यातील माळेगाव बंदला सर्व घटकांनी कडकडीत बंद पाळुन पाठिंबा दिला.तर आंदोलकांनी निरा -बारामती राज्य मार्ग रोखुन धरत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

  धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण लागू करावे यासाठी माळेगाव येथील चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी बारामती येथील प्रशासकीय भवन समोर आमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाचा ९ वा दिवस सुरू आहे.
  या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाने माळेगाव बंदचे आवाहन केले होते त्यास मोठा प्रतिसाद मिळुन सर्व घटकांनी व व्यापारी यांनी व्यावसायिक बंद ठेवून पाठिंबा दिला.संतप्त आंदोलकांनी निरा -बारामती राज्य मार्ग रोखुन धरल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

  यावेळी संतोष वाघमोडे,बंडुनाना पडर,दीपक वाघमोडे,प्रविण वाघमोडे, अनिल वाघमोडे, मधुकर वाईकर, रिपाइंचे तालुका युवकाध्यक्ष विश्वास भोसले यांनी मनोगत व्यक्त करुन शासना विरोधात संताप व्यक्त केला.यावेळी यळकोट यळकोट जय मल्हार..आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.. चंद्रकांत वाघमोडे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर, उपनिरीक्षक देवीदास साळवे, तुषार भोर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.